Connect with us

गोवा खबर

ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बाजार २०२५ मध्ये गोवा पर्यटनाचे दमदार प्रदर्शन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने राजस्थानातील जयपूर येथे ४ ते ६ मे २०२५ दरम्यान आयोजित ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बाजार (जीआयटीबी) २०२५च्या पहिल्या दिवशी राज्यातील विविध पुनरुत्पादक पर्यटन सेवांचे यशस्वी प्रदर्शन करून गोवा पर्यटनाची उल्लेखनीय छाप सोडली आहे. 

राजस्थान सरकार, भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (एफआयसीसीआय) आयोजित जीआयटीबी २०२५ ने गोवा पर्यटनाला आंतरराष्ट्रीय खरेदीदार, टूर ऑपरेटर आणि प्रमुख उद्योग भागधारकांशी संवाद साधण्यासाठी एक सक्रिय व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

गोवा सरकारचे पर्यटन सचिव संजीव आहुजा, आयएएस, पर्यटन संचालक केदार नाईक, जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गेविन डायस आणि पर्यटन खात्याचे उपसंचालक (दक्षिण) राजेश काळे यांच्या नेतृत्वाखालील गोवा शिष्टमंडळाने, जागतिक पर्यटन बाजारपेठेत गोव्याचे अस्तित्व बळकट करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय बी२बी बैठका, धोरणात्मक सत्रे आणि नेटवर्किंग संवादांमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला.

यावेळी आयोजित एक सत्रात संजीव आहुजा, आयएएस, यांनी गोव्याचे प्रतिनिधित्व प्रतिष्ठित पॅनेल सदस्य म्हणून केले. या पॅनेलमध्ये मुकेश कुमार मेश्राम, प्रधान सचिव, पर्यटन, उत्तर प्रदेश सरकार; राजेंद्र कुमार, सचिव, पर्यटन, गुजरात सरकार; रवी जैन, सचिव, पर्यटन, राजस्थान सरकार आणि बलवंत सिंग, आयुक्त तथा सचिव, पर्यटन, ओडिशा सरकार यांचा समावेश होता. या सत्रात “कॅटॅलिझिंग ग्रोथ: हाव टुरिझम पॉलिसीज आर अट्रॅक्टिंग एमआयसीई ऑपर्च्युनिटीज” या विषयावर चर्चा झाली. संजीव आहुजा यांनी गोव्याच्या भविष्यकालीन धोरणात्मक चौकटी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि मार्केटिंग धोरणांबद्दल माहिती आली. गोव्याला उदयोन्मुख एमआयसीई हब म्हणून स्थान देण्यात आले.

या कार्यक्रमाविषयी विचार व्यक्त करताना, पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, जीआयटीबीमधील गोव्याचे दमदार प्रदर्शन हे समुद्रकिनाऱ्याच्या पलीकडे नेणाऱ्या गोव्याचे प्रतिबिंब आहे. येथे मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा पुनरुत्पादक पर्यटन, सांस्कृतिक अनुभव आणि शाश्वत प्रवास कथांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या प्रयत्नांना पुष्टी देतो. पर्यटन क्षेत्राच्या अर्थपूर्ण वाढीसाठी, आम्ही सहभाग आधारित काम करण्यास उत्सुक आहोत.

जीआयटीबी २०२५ मधून उदयास येणाऱ्या मजबूत भागीदारी आणि नवनवीन सहकार्यांसह, गोवा पर्यटन आता जबाबदार वाढ आणि जागतिक सहभागासाठी नवीन मार्ग खुले करण्यास उत्सुक आहे.