गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सागरी बंदराचे लोकार्पण केले.
भगवान आदि शंकराचार्य यांच्या जयंतीदिनाच्या मंगल प्रसंगी कार्यक्रमासाठी जमलेल्या उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या वंदनीय जन्मस्थानाला भेट देण्याचा सन्मान प्राप्त झाल्याची आठवण सांगितली.
काशी या पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघात आदि शंकराचार्य यांचा भव्य पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा पुतळा म्हणजे आदि शंकराचार्य यांची प्रचंड अध्यात्मिक विद्वत्ता आणि शिकवण यांच्याप्रती आदरांजली प्रतीक आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्याला उत्तराखंडातील पवित्र केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचा सन्मान देखील प्राप्त झाला आहे. केदारनाथ मंदिराची कवाडे आज भाविकांसाठी खुली झाल्यामुळे, आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुळचे केरळचे असलेल्या आदि शंकराचार्य यांनी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आदि शंकराचार्य यांच्या प्रयत्नांनी एकसंघ आणि अध्यात्मिकदृष्ट्या जागृत भारताच्या उभारणीचा पाया रचला यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.
एका बाजूला अफाट संधींनी संपन्न असलेला विशाल महासागर तर दुसरीकडे निसर्गाचे मनमोहक सौंदर्य त्याच्या भव्यतेत आणखी भर घालत असल्याचे मोदींनी अधोरेखित केले, या सर्व गोष्टींमध्ये विझिंजम खोल-पाण्यातील सागरी बंदर आता नव्या युगाच्या विकासाचे प्रतीक म्हणून उदयास आले आसल्याचे त्यांनी नमूद केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी केरळच्या जनतेचे आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.
विझिंजम खोल पाण्यातील सागरी बंदर ₹ 8,800 कोटी खर्चून विकसित करण्यात आल्याचे सांगून सागरीमालवाहतूक केंद्राची क्षमता येत्या काही वर्षांत तिप्पट होईल, त्यामुळे जगातील काही मोठी मालवाहू जहाजेही या बंदरातून सुरळितपणे ये-जा करू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताट जहाजावरच्या 75% मालवाहतुकीचे परिचालन पूर्वी परदेशी बंदरांतून केले जात असे, परिणामी देशाला मोठ्या प्रमाणात महसूल गमवावा लागत होता, याकडे लक्ष वेधले. ही परिस्थिती आता लवकरच पालटणार असल्याने भारताचा पैसा आता भारतीयांच्या सेवेसाठीच वापरता येईल आणि पूर्वी देशाबाहेर जाणारा पैसा आता यापुढे केरळ आणि विझिंजममधील नागरिकांना नवीन आर्थिक संधी निर्माण करेल, अशी त्यांनी ग्वाही दिली.
वसाहतवादी राजवटीपूर्वीच्या अनेक शतकांत भारताने समृद्धी अनुभवली होती आणि एकेकाळी जागतिक जीडीपीमध्ये भारताचा मोठा वाटा होता असेही मोदींनी नमूद केले. त्या काळात भारताची सागरी क्षमता आणि बंदराच्या शहरांमधील आर्थिक उलाढाल यामुळे इतर देशांपेक्षा भारताचे वेगळेपण उठून दिसणारे होते यावर त्यांनी भर दिला. हे सागरी सामर्थ्य आणि आर्थिक विकासात केरळची महत्त्वाची भूमिका होती असे नमूद करून, त्यांनी सागरी व्यापारात केरळची ऐतिहासिक भूमिका असल्याचे अधोरेखित केले तसेच अरबी समुद्राद्वारे भारताने विविध देशांसोबतचे व्यापारी संबंध जपले होते, याचाही त्यांनी उल्लेख केला. केरळमधील जहाजे विविध देशांमध्ये मालाची वाहतूक करतात, त्यामुळे जागतिक व्यापारात ते एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
“आज, भारत सरकार आर्थिक सामर्थ्याची ही वाहिनी आणखी बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे सांगून “भारतातील किनारी राज्ये आणि बंदराची शहरे विकसित भारताच्या वाढीची प्रमुख केंद्रे बनतील”, असेही ते पुढे म्हणाले.
पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहताना तसेच त्यांचा सेवाभाव आणि ख्रिश्चन परंपरांमध्ये समावेशकता सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना, संपूर्ण जग त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवेल असे पंतप्रधानांनी म्हटले. पोप फ्रान्सिस यांना भेटण्याच्या अनेक संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले. त्यांनी नमूद केले की त्यांना त्यांच्याकडून विशेष स्नेह मिळाला आणि मानवता, सेवा आणि शांती या विषयावरील त्यांच्यासोबत झालेल्या चर्चा , या भेटी सतत प्रेरणा देत राहतील असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा देताना मोदी यांनी केरळला जागतिक सागरी व्यापाराचे एक प्रमुख केंद्र म्हणून बघत असल्याचे सांगून यामुळे याठिकाणी हजारो नवीन रोजगार निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करणाऱ्या भारत सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. मोदी यांनी केरळच्या लोकांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत “भारताचे सागरी क्षेत्र नवीन उंची गाठेल” असे सांगून आपल्या संबोधनाचा समारोप केला.
या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.