Connect with us

गोवा खबर

… हा तर सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! : गोविंददेव गिरी

Published

on

Spread the love

गोवा खबर : सनातन संस्थेच्या माध्यमातून गेली २५ वर्षे अविरतपणे हिंदू राष्ट्रासाठी जागरण करत असलेले डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ महोत्सव नसून भारताला पुन्हा तेजस्वी, समर्थ बनवण्याचा आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याचा जागर आहे, असे गौरवोद्गार ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी महोत्सवासाठी पाठवलेल्या संदेशात काढले आहेत.

ते म्हणाले, ‘सनातन संस्था’च्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून आज हजारोंच्या संख्येने समर्पित कार्यकर्ते स्थानस्थानावर जाऊन निष्काम भावनेने व स्वयंशिस्तीने सनातन धर्माचा प्रसार करत आहेत. या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवनाचा स्वाध्याययज्ञ, सेवायज्ञ आणि लोकजागरणयज्ञ सुरू केला आहे. हे कार्य अत्यंत विलक्षण आहे आणि त्यातूनच सनातन राष्ट्राच्या अभ्युदयाचा मार्ग उजळणार आहे.

गोविंददेव गिरी

ते म्हणाले, या महोत्सवात विविध राष्ट्रनिष्ठ नेते, धर्माचार्य, कार्यकर्ते आणि सनातनप्रेमी एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. या मंथनातून केवळ नवनीत नव्हे, तर अमृत उदयाला येईल आणि याच अमृतकलशातून सनातन राष्ट्राला नवतेज प्राप्त होईल. आज भारताला समर्थ राष्ट्र बनवायचे असेल, तर सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांची पुनःस्थापना करणे अत्यावश्यक आहे; कारण भारताच्या सामर्थ्यावरच जगात समता, बंधुता आणि खरी स्वतंत्रता टिकू शकते. म्हणूनच हे कार्य एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संस्थेचे नसून, धर्माचे आणि राष्ट्राचे कार्य आहे. आणि म्हणूनच हे प्रत्यक्ष भगवानाचे कार्य आहे.

त्यामुळे सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, धर्मगुरूंनी आणि सामान्य भक्तांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचे आणि सेवाभावाचे योगदान द्यावे. सनातन धर्माची मूळ अधिक बळकट करण्यासाठी आणि भारताच्या सुंदर, समृद्ध भविष्यासाठी हा महोत्सव एक सुवर्णसंधी आहे. या महामंथनातून मिळणाऱ्या तेजाने भारत गगनभरारी घेईल आणि सनातन धर्माचा दिव्य प्रकाश संपूर्ण जगात पसरेल. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिव्य कार्यात सहभागी होऊया आणि भारताला त्याच्या सनातन तेजाने पुन्हा उभे करूया, असेही आवाहन त्यांनी केले.