गोवा खबर : ‘काळीज उसवलां’ हे आत्मपर आठवणींचे पुस्तक म्हणजे बालमनावर संस्कार करणारे पुस्तक होय, या पुस्तकाचे घराघरांत सामूहिक वाचन होण्याची गरज आहे. हे पुस्तक वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या नजरेतून समजून घेण्यासाठी ‘काळीज उसवलां : म्हजे नदरेंतल्यान’ या पुस्तकाचे वाचन अवश्य केले पाहिजे, असे प्रतिपादन रवींद्र केळेकार विद्यालयाचे मुख्याद्यापक अनंत अग्नी यांनी केले.
प्रसिद्ध कवी उदय म्हांबरो यांच्या ‘काळीज उसवलां’ या पुस्तकावरील आस्वादात्मक समीक्षापर ”काळीज उसवलां : म्हजे नदरेंतल्यान’ या प्रसिद्ध समीक्षक काशिनाथ नायक यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. आर्ला केरी येथील ट्रॉपिकल स्पायस प्लांटेशन मध्ये आयोजित कार्यक्रमाच्या या मंचावर लेखक, संपादकांसह प्रसिद्ध साहित्यिक दिलीप बोरकार, विशेष अतिथी दुर्गादास परब यांची उपस्थिती होती.
मुले जे मागतात ते देण्याऐवजी, त्यांना काय गरजेचेच आहे ते समजून घेऊन तेवढ्याच बाबी मुलांना देण्याकडे पालकांचा कटाक्ष असला पाहिजे, असेही यावेळी अनंत अग्नी यांनी आवाहन केले.
काळीज उसवणे आणि काळीज खोलून बघणे यात फरक आहे. योग्य वेळी आपण काळजातील भावना उलगडल्या नाहीत तर, त्याचा आपल्याच आरोग्यावर परिणाम होतो. आणि मग श.स्त्रक्रियेद्वारा काळीज खोलावे लागते, असे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप बोरकार यांनी नमूद केले. दुर्गादास परब यांनी सदर पुस्तकांचे मल्याळम, कन्नड, मराठी भाषेत अनुवाद झाले आहेत, तसे इतर भारतीय भाषांमध्येही अनुवाद प्रसिद्ध होतील, असा आशावाद व्यक्त केला. संपादक काशिनाथ नायक यांनी पुस्तकातील मानवी मूल्यांवर प्रकाश टाकला.
यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार साहित्यिक, विचारवंत उदय भेंब्रे, माधव बोरकर, डॉ. जयंती नाईक, डॉ. प्रकाश पर्येकर यांच्यासह कोंकणी आणि मराठी साहित्य जगतातील विविध लेखक, वाचक आणि रसिक आवर्जून उपस्थित होते.
संजना प्रकाशनचे प्रकाशक दिनेश मणेरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर उदय म्हांबरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मानसी धाऊस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.