गोवा खबर
जिथे हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन स्थापित झाले होते, त्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट देणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे:अमित शहा
Published
1 year agoon
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रात रायगड येथे आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
गोवा खबर:केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावर आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की जिथे हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन स्थापित झाले होते, त्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट देणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या कानाकोपऱ्यात स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत केली आणि पाहता-पाहता आदिलशाही, मुघल आणि निजामशाही साम्राज्याने वेढलेल्या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्यात रूपांतर झाले. पुढे काही वर्षांतच, अटकेपासून कटकपर्यंत आणि दक्षिणेकडील बंगालपासून तामिळनाडूपर्यंत देशभर स्वराज्याचे स्वप्न साकार होऊ लागले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा देशातील जनता अंधःकारात बुडाली होती. असे वातावरण होते की स्वराज्याची कल्पना करणेही अशक्य वाटत होते. देवगिरीच्या पतनानंतर अवघ्या शंभर वर्षांतच महाराष्ट्र आणि संपूर्ण दक्षिणेकडील प्रदेशाचा ऱ्हास झाला आणि हळूहळू स्वतःच्या धर्माबद्दल आणि स्वराज्याबद्दल बोलणे हा गुन्हा मानले जाऊ लागले.

मात्र अशा काळात, आपली आई राजमाता जिजाबाईंपासून प्रेरित होऊन, एका 12 वर्षांच्या मुलाने सिंधू नदीपासून कन्याकुमारीपर्यंत पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकवण्याची प्रतिज्ञा केली. शाह म्हणाले की त्यांनी जगभरातील अनेक महान नेत्यांची चरित्रे वाचली आहेत, परंतु अशी अढळ इच्छाशक्ती, अदम्य साहस , अकल्पनीय रणनीती आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन अजेय सैन्य उभारण्याची क्षमता, अशी वैशिष्ट्ये – छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अन्य कोणाच्याही अंगी आढळली नाहीत.
अमित शहा म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांना ना नशीबाची साथ होती, ना सामर्थ्यशाली वारसा, ना संपत्ती ना मोठे सैन्य. तरीही, अगदी लहान वयात त्यांनी आपल्या अतुलनीय धैर्य आणि दृढ संकल्पाने संपूर्ण देशाला स्वराज्याच्या मंत्राने प्रेरित केले. 200 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य करणाऱ्या मुघल साम्राज्याला काही काळातच उद्ध्वस्त करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
जेव्हा शिवाजी महाराजांचे सैन्य अटक, बंगाल, कटक आणि तामिळनाडू येथे पोहोचले, तेव्हा देशभरातील लोकांचा राष्ट्र, त्याचा धर्म, भाषा आणि संस्कृती यांचे रक्षण होणार आहे, यावर पुन्हा एकदा विश्वास बसू लागला.
प्रत्येक क्षेत्रात भारताला जगात सर्वोत्कृष्ट बनवण्याची संकल्पना सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी मांडली, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की आज भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर, आम्ही जगासमोर अभिमानाने उभे आहोत आणि जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा देश प्रत्येक क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त करेल, असा आम्ही संकल्प करतो.
राजमाता जिजाबाईंनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही तर त्यांना स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचे पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणाही दिली, असे अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले. शिवराय वयाने अगदी लहान असतानाच जिजाबाईंनीच त्यांच्या मनात संपूर्ण देश स्वतंत्र करण्याची आणि हिंदवी साम्राज्याची स्थापना करण्याची संकल्पना रुजवली.
राजमाता जिजाबाईंनी तरुण शिवरायांवर मूल्ये आणि सद्गुणांचे संस्कार केले आणि शिवरायांनी त्या मूल्यांचे महान वटवृक्षात रूपांतर केले, असे शाह म्हणाले, ते पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, संताजी आणि तानाजी यांनी मुघल सम्राट औरंगजेबाविरुद्ध मरेपर्यंत लढा दिला. परिणामी, स्वतःला “आलमगीर” (जग जिंकणारा) म्हणवून घेणारा माणूस शेवटी महाराष्ट्रात पराभूत झाला आणि त्याची समाधी इथेच त्याचा पुरावा म्हणून राहिली.
भारतातील प्रत्येक बालकाला शिवाजी महाराजांचे जीवन आणि वारसा याविषयी माहिती करून देणे हे आपले कर्तव्य आहे यावर शाह यांनी भर दिला. ते म्हणाले की शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहू नयेत, संपूर्ण देश आणि जगालाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळू शकते.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा या बाबी मानवी जीवनातील स्वाभिमानाशी खोलवर जोडलेल्या आहेत. शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची ही तीन मूलभूत मूल्ये राष्ट्र आणि जगासमोर आणली. त्यांनी हे अशा वेळी केले जेव्हा आक्रमकांनी आपल्याला चिरडून टाकले होते आणि पराभूत केले होते, तसेच समाजात गुलामगिरीची मानसिकता रुजली गेली होती. परंतु शिवाजी महाराजांनी ही पराधीनतेची मानसिकता मोडून काढली आणि हिंदवी साम्राज्याची पुनर्स्थापना केली, लोकांमध्ये अभिमान, प्रतिकार आणि स्वातंत्र्याची भावना पुन्हा जागृत केली.
अमित शहा म्हणाले की शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास – त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत – रायगडाच्या या पवित्र भूमीशी जोडलेला आहे. या पवित्र स्थानाची कल्पना “शिवस्मृती” म्हणून करणारे महान स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक यांचेही स्मरण त्यांनी केले.
शाह म्हणाले की इंग्रजांनी जाणूनबुजून रायगड किल्ला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, कारण तो स्वराज्याचे एक शक्तिशाली प्रतीक होता. टिळकांनी हे महत्त्व ओळखले आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या त्यांच्या प्रसिद्ध घोषणेद्वारे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दृष्टिकोनाशी असलेली बांधिलकी पुन्हा स्थापित केली.
ते पुढे म्हणाले की टिळकांच्या हयातीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही, परंतु त्यांनी स्मारकाचे जतन करण्यासाठी चळवळ सुरू केली. तथापि, ब्रिटीश राजवटीतही, हे स्थळ शिवजयंती उत्सवापासून स्वराज्यापर्यंतचे प्रतीक बनले, जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात ठरले.
शाह म्हणाले की महाराष्ट्र सरकार आता टिळकांनी सुरू केलेल्या या वारशाचा सन्मान आणि जतन करण्याच्या उदात्त कार्याला पुढे नेत आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकार रायगड स्मारकाला केवळ पर्यटन स्थळ बनवण्यासाठीच नव्हे तर विविध आधुनिक सुविधा देऊन देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनवण्यासाठी वचनबद्ध आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की राज्यातील इयत्ता 7 वी ते 12 वी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एकदा तरी या पवित्र स्थळाला भेट घेऊ द्यावी, जेणेकरून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाशी आणि आदर्शांशी जोडले ते जाऊ शकतील.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनाच्या क्षेत्रात असंख्य तत्त्वे आखून दिली होती, असे अमित शहा यांनी सांगितले. त्यांच्या अष्टप्रधान मंडळाच्या संकल्पनेचा आजच्या काळात मंत्रिमंडळाच्या स्वरूपात अवलंब केला गेला आहे आणि हे मंत्रिमंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळाचेच विस्तारित स्वरूप आहे, असे ते म्हणाले.
शिवाजी महाराजांनी न्यायासाठी अनेक तत्त्वांची मांडणी केली आणि सत्ताधाऱ्यांनी त्या तत्त्वांची अंमलबजावणी केली, असे अमित शहा यांनी सांगितले. आपल्या कर्तृत्वातून शिवाजी महाराजांनी सुशासनाचा सर्वोत्तम मापदंड स्थापित केला, अशा शब्दांत शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
स्वराज्यासाठी संघर्ष, स्वधर्माचा सन्मान आणि स्वभाषेचे अमरत्व हीच शिवाजी महाराजांनी दिलेली अंतिम शिकवण आहे, आणि त्या दिशेने वाटचाल कधीही थांबता कामा नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संघर्षाचा हाच वारसा अभिमानाने पुढे नेला जात असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक पातळीवर सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम केले आहे असे त्यांनी नमूद केले.
काशी विश्वनाथ मंदिराचा जिर्णोद्धार, सर्व ज्योतिर्लिंगांपर्यंतचा सुलभ प्रवास, आणि रामजन्मभूमीचे पुनरुत्थान असाच शिवाजी महाराजांचाही दृष्टिकोन होता, असे अमित शहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ही सर्व कामे पूर्णत्वाला नेण्यात आली. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराला नवचैतन्य दिले गेले आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या माध्यमातून त्याचे पुनरुत्थान करण्यात आले, असे अमित शहा यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांच्या शिकवणीला पूर्णतः मूर्त रूप मिळवून देण्यासाठी उर्वरित कामे पूर्ण करण्याकरता संपूर्ण देश वचनबद्ध आहे, असे अमित शहा यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज हे दृढनिश्चय, निष्ठा, त्याग, शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या अमर भावनेचे प्रतीक आहेत असे ते म्हणाले. त्यांचा वारसा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मोहीम राबवलेली आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला भारतीय नौदलाचे प्रतीक बनवले, आणि या कृतीतून आपला देश आणि आपले स्वराज्य पूर्णपणे सुरक्षित असल्याचा संदेश जगाला दिला असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकार, 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
You may like
-
Valpoi Records Highest Rainfall, Pernem Receives the Lowest in Goa During Last 24 Hours
-
मुख्यमंत्र्यांहस्ते पत्रकार कृत्तज्ञता निधी योजनेखाली मंजुरी पत्र प्रदान
-
“Kosambi biography, excellent gift on genius’ 119th birth anniversary’” opine scholars
-
हंसापूर (पेडणे) येथे ५४ व्या संस्कार वर्गाचे उत्साहात उद्घाटन
-
‘Rashtriya Shuddhikaran Din’ Observed in Solapur; Five Re-enter Hindu Dharma
-
Roundglass Tennis Academy’s Puneeth Manohar crowned Doubles Champion at U-14 Super Category event in Germany
