गोवा खबर : गोवा पर्यटनाने ओमानमधील मस्कत येथे एक प्रभावी रोड शोचे यशस्वीरित्या आयोजन करून मध्य पूर्व भागात, गोव्याला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याची त्यांची वचनबद्धता अधिक बळकट केली आहे. या रोड शोने प्रमुख प्रवासी व्यापार व्यावसायिक, टूर ऑपरेटर, मीडिया प्रतिनिधी आणि संभाव्य गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यासाठी एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून काम केले, ज्यामध्ये गोव्याच्या विविध पर्यटन सेवा आणि उदयोन्मुख संधींवर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमात जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर आणि ओमानच्या प्रवास व आतिथ्य उद्योगातील आघाडीच्या भागधारकांची सन्माननीय उपस्थिती दिसून आली.
गोवा पर्यटनाच्या शिष्टमंडळासोबत टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखीजा यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅव्हल ट्रेड असोसिएशनचे सदस्य आणि चार्टर ऑपरेटर, हॉटेल व्यावसायिक तसेच ट्रॅव्हल एजंट यांचा समावेश होता.
या रोड शोमध्ये एक आकर्षक नेटवर्किंग सत्र झाले. या सत्रात प्रमुख चर्चा ही नवीन पर्यटन उपक्रमांभोवती झाली. यात पुनरुत्पादीत पर्यटन, हरित-पर्यटन सर्किट, वेलनेस पर्यटन, साहस पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा अनुभव यासारख्या विशिष्ट विभागांचा प्रचार, यांचा समावेश होता. मस्कतमधील भारतीय दूतावासातील मिशन उपप्रमुख ताविशी बहल यांनी रोड शोमध्ये उपस्थितांना आपल्या भाषणाने संबोधित करताना, गोवा आणि ओमानमधील वाढत्या पर्यटन व सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकला.

रोड शोबद्दल भाष्य करताना, माननीय पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, गोवा आपल्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडील पर्यटनासाठी विकसित होत आहे आणि समृद्ध असा पर्यटन अनुभव देत आहे. यात गोव्यातील अंतर्गत स्थळे आणि आध्यात्मिक सर्किट्सच्या शांत आकर्षणापासून ते एमआयसीई पर्यटनासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. ओमानमधील या रोड शोद्वारे, आम्ही मध्य पूर्व बाजारपेठेशी संबंध मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. तसेच प्रवासी आणि व्यवसायांना गोव्याची चैतन्यशील संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य व एक समग्र पर्यटन स्थळ म्हणून गोव्याची वाढती क्षमता शोधण्यासाठी आमंत्रित करतो.
रोड शोचे महत्त्व अधोरेखित करताना, पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, गोवा स्वतःला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखतो आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त देखील अनेक अनुभव देत आहे. गोवा नेहमीच संस्कृतींचा मेळ घालणारा प्रदेश राहिला आहे, जो पर्यटकांना समृद्ध वारसा, शांत रमणीय भूप्रदेश आणि तल्लीन करणारे अनुभव यांचे मिश्रण देतो. धोरणात्मक आंतरराष्ट्रीय सहभागाद्वारे, आम्ही पर्यटन भागीदारी मजबूत करणे, जोडणी वाढवणे आणि पुनरुत्पादीत व शाश्वत पर्यटनासाठी आमची वचनबद्धता प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर यांनी त्यांच्या प्रमुख भाषणात, जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे स्थान अधोरेखित केले आणि पुनरुत्पादीत पर्यटन मॉडेल अंतर्गत नवीन उपक्रमांवर प्रकाश टाकला. ओमान हे गोव्यासाठी एक महत्त्वाचे पर्यटन बाजारपेठ आहे आणि आम्ही आमचे पर्यटन सहकार्य मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या रोड शोने धोरणात्मक भागीदारी वाढवणे, जोडणी वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आकर्षित करणारे, नवीन प्रवास अनुभव सादर करण्यासाठी एक मौल्यवान व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ओमानच्या प्रवासी व्यापारी समुदायाचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. ओमानमधून येणाऱ्या अधिक पर्यटकांचे स्वागत करण्यास आणि गोव्याच्या समृद्ध अशा सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे प्रदर्शन करणारे सानुकूलित अनुभव तयार करण्यासाठी, भागधारकांसोबत जवळून काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
रोड शोचा एक भाग म्हणून, गोवा पर्यटनाने क्राउन प्लाझा मस्कत येथे एक विशेष ‘गोवा इव्हनिंग’चे देखील आयोजन केले होते, जिथे उपस्थितांनी पारंपारिक लोककला सादरीकरण, डेस्टिनेशन सादरीकरण आणि नेटवर्किंग डिनरद्वारे गोव्याच्या उत्साही संस्कृतीची झलक अनुभवली.
ओमानमधील गोवा पर्यटनाच्या रोड शोने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गोव्याचा विस्तार करण्यासाठी आणि एक लोकप्रिय प्रवास स्थळ म्हणून त्याची उपस्थिती मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सहकार्य आणि सहभागावर लक्ष केंद्रित करून, गोवा पर्यटन हे शाश्वत आणि जबाबदार अशा पर्यटन वाढीसाठी जागतिक प्रवासी भागीदारांसोबत अर्थपूर्ण संबंध स्थापित करत आहे.