गोवा खबर : आपल्या सर्व देवता वैभवसंपन्न आहेत, त्यामुळे व्यावसायिकांनी पण वैभवसंपन्न जीवन जगायचे ध्येय ठेवले पाहिजे. आज व्यवसाय करतांना विविध प्रकारच्या ताण-तणावांना सामोरे जावे लागते. हा तणाव दूर करण्यासाठी, तसेच व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी, व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी नेतृत्व, प्रामाणिकपणा, धाडस या गुणांसह आध्यात्मिक बळ साहाय्यभूत ठरते. आध्यात्मिक आणि ऐहिक उन्नती साध्य करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे उद्गार पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी काढले.
ते ‘अध्यात्म आणि व्यावसायिक जीवनात यशप्राप्ती’ या विषयावर पणजी येथे गोव्यातील व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘सारस्वत ग्लोबल चेंबर’, ‘गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्री’ आणि ‘लघु उद्योग भारती’ यांच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्रभुदेसाई पुढे म्हणाले, अहंकारामुळे मीपणा वाढतो, तर साधनेमुळे तो न्यून होतो आणि आपण सहकार्यांचे म्हणणे ऐकू लागतो. स्वभावदोष अल्प केले की, नेतृत्वात वाढ होते. दोष-अहंकारामुळे, तुलनेच्या विचारांमुळे स्वत:चीच हानी होते. बुद्धी स्थिर केल्याने ध्येय जलद गतीने साध्य होते. जीवनात एखादा प्रश्न निर्माण झाला असता स्वत:चे मन स्थिर असेल, तर तो प्रश्न अंतर्मनात जातो, अंतर्मन विश्वमनाशी जोडले जाते आणि विश्वमनातून त्याचे उत्तर येते. स्वत:ची सात्त्विकता वाढल्यावर प्रज्ञा आणि कल्पकता वाढते, नकारात्मकता दूर होऊन आपण सकारात्मक आणि आनंदी होतो. उद्योजकांचे संघटन वाढवून त्याचा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे. आपली शक्ती जागृत आणि संघटित केली पाहिजे. कॅसिनोसारख्या आसुरी प्रवृत्तीवर अंकुश आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. अनिल खंवटे, प्रतिमा धोंड, पल्लवी साळगावकर, संजय आमोणकर, सुनील सौदागर यांनी दीपप्रज्वलन केले. नारायण नाडकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. पणजी, म्हापसा आणि फोंडा परिसरातील अनेक व्यावसायिकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.