गोवा खबर : गोव्याच्या विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठताना, दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रतिष्ठित एसीआय-एएसक्यू सर्वेक्षण २०२४ मध्ये एएसक्यू मानांकनाच्या आधारे भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत (एएआय) सर्वोत्तम विमानतळ म्हणून स्थान देण्यात आले आहे.
एएआयच्या ३०व्या वार्षिक दिनी केलेल्या या घोषणेने, दाबोळी विमानतळाची अपवादात्मक सेवा गुणवत्ता आणि प्रवासी अनुभव यावर प्रकाश टाकला. याने दाबोळी विमानतळाला, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुढचे स्थान दिले.
जोडणी आणि पायाभूत सुविधांमधील लक्षणीय सुधारणांमुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाने जोरदार प्रगती केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवाशांना उत्तम अनुभव मिळावा, यासाठी राज्य आपल्या वाहतूक सुविधांचा विस्तार करत आहे आणि शाश्वत पर्यटन उपक्रम विकसित करत आहे. पर्यटन-संबंधित सुविधांचा सुरू असलेला विस्तार हा गोव्याला येथील सांस्कृतिक आणि पर्यावरणीय अखंडता जपून ठेवताना, एक प्रमुख पर्यटन स्थळ बनवण्याच्या सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत करतो.

गोवा सरकारचे पर्यटन संचालक केदार नाईक यांनी या मान्यतेबद्दल उत्साह व्यक्त करताना सांगितले, दाबोळी विमानतळाला मिळालेल्या सर्वोच्च रँकिंगमध्ये गोव्याचे आदरातिथ्य आणि पायाभूत सुविधांमधील उत्कृष्टता दिसून येते. आम्ही पर्यटन क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे राज्याची जोडणी अधिक वाढविण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे गोवा हे जगभरातील प्रवाशांसाठी जागतिक दर्जाचे स्थळ राहील, याची खात्री होईल.
दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विमानतळ संचालक जॉर्ज व्हर्गीस म्हणाले, मला अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने हे घोषित करायचे आहे की, गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाबोळीला २०२४च्या एसीआय-एएसक्यू सर्वेक्षणात एएसक्यू रेटिंगसाठी भारतातील एएआय विमानतळांमध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार उत्कृष्ट सेवा गुणवत्ता आणि प्रवासी अनुभवांसाठी आहे. आमच्या प्रयत्नांना मिळलेली ही ओळख, आम्हाला अत्याधुनिक प्रवासी सुविधा प्रदान करण्यासाठी एक टीम म्हणून जबाबदार बनवते.
राज्यात पायाभूत सुविधांचा विकास हा राज्याच्या समृद्ध वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याशी सुसंगत होईल, याची खात्री करण्यासाठी गोवा सरकार शाश्वत आणि पुनरुत्पादक पर्यटनावर लक्ष केंद्रित करत आहे. सुधारित रस्त्यांच्या नेटवर्कपासून ते पर्यावरणपूरक पर्यटन सुविधांच्या विस्तारापर्यंत, गोव्याने जबाबदार पर्यटन विकासात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.