Connect with us

गोवा खबर

‘ब्रिजिंग होरायझन्स’ घेतेय उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील भविष्याचा शोध

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीई अँड सी) खात्याच्या सहकार्याने असोचेम गोवा राज्य विकास परिषदेतर्फे ‘ब्रिजिंग होरायझन्स: कॉन्फ्लुअन्स ऑफ इंडस्ट्री, इन्स्टिट्यूट अँड इनोव्हेशन’ची चौथी आवृत्ती, केपे येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये आयोजित करण्यात आली होती. कौशल्य-आधारित शिक्षण, उद्योग-शैक्षणिक सहयोग आणि मनुष्यबळ तयारीची गरज अधोरेखित करून, शिक्षण आणि उद्योग यांच्यातील विकसित संबंधांवर या कार्यक्रमात लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

गोवा सरकारचे आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीई अँड सी) खाते आपल्या स्कीलिंग, रीस्कीलिंग आणि अपस्किलिंग उपक्रमांद्वारे उद्योगाच्या गरजांनुसार प्रतिभा निर्माण करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत. उद्योग-शैक्षणिक बैठका, व्हेंचर कॅपिटल इव्हेंट्स आणि कॉर्पोरेट भागीदारी यासारखे प्रयत्न व्यावसायिक आणि व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत. याद्वारे विकसित होत असलेल्या नोकरीच्या बाजारपेठेत गोव्याचे स्थान मजबूत करत आहेत. ‘ब्रिजिंग होरायझन्स: कॉन्फ्लुअन्स ऑफ इंडस्ट्री, इन्स्टिट्यूट अँड इनोव्हेशन’ या सत्राद्वारे कौशल्य विकास आणि उद्योग सहकार्यावर चर्चा सुलभ करून, उद्योग-शैक्षणिक संबंध मजबूत करण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला.

या कार्यक्रमात प्रकल्प संचालक, पीएमयू केअर्स, तंत्रशिक्षण संचालनालय, गोवा सरकार डॉ. विजय बोर्गेस यांनी कौशल्य-आधारित शिक्षण व कामाच्या भविष्याकडे लक्ष वेधून, उद्योगाच्या मागण्यांशी सुसंगत असलेल्या कौशल्य-आधारित शिक्षणाच्या गरजेवर भर देणारे, मुख्य सादरीकरण केले. त्यांनी हायर-ऑर्डर थिंकिंग स्किल्स (हॉट्स) चे महत्त्व अधोरेखित केले, जसे की संगणकीय विचार, सर्जनशीलता, सहयोग आणि विद्यार्थ्यांना कार्यशक्तीसाठी तयार करण्यास नैतिक जागरूकता यावर भर दिला. त्यांनी मूलभूत शिक्षणातील अंतर दूर करताना, त्याचा शैक्षणिक प्रगती आणि रोजगारक्षमतेवर दीर्घकालीन प्रभाव नोंदवला. तसेच त्यांनी बेरोजगारी, लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि ऑटोमेशनचा वाढता प्रभाव, यासारख्या आव्हानांवरही चर्चा केली व कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी सतत उच्च कौशल्य आणि मजबूत उद्योग-शैक्षणिक सहकार्याच्या गरजेवर भर दिला.

‘द फ्युचर ऑफ इंडस्ट्री आणि ॲकॅडेमिया’ या विषयावरील पॅनेल चर्चेने उद्योग नेत्यांना एकत्र आणले आणि आयटी हब म्हणून गोव्याची क्षमता, विस्तारित होण्याची अपेक्षा असलेली क्षेत्रे आणि शिक्षण व रोजगाराला आकार देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची भूमिका, यावर चर्चा केली. या चर्चेत श्री. मंगिरिश सालेलकर, अध्यक्ष, आयटी आणि आयटीईएस समिती, असोचेम गोवा आणि सीईओ, उमंग समूह; सुदीप फळदेसाई, प्रकल्प अधिकारी, गोवा स्टेट इनोव्हेशन काऊन्सिल, गोवा सरकार; मोहसीन शेख, संस्थापक संचालक, हजटेक; महेंद्र तिवारी, सीईओ, इथरनेटएक्सप्रेस इंडिया प्रा. लि.; भावित नाईक, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, टेक्नोरिक्स; आणि रघु शेट्ये, संचालक, डीएनए गोवा ब्रॉडबँड या वक्त्यांनी विचार व्यक्त केले. या पॅनेलमधील सदस्यांनी उद्योग-शैक्षणिक सहयोग हा कौशल्यातील अंतर भरून काढण्यास आणि आर्थिक विकासासाठी संधी निर्माण करण्यास, कशी मदत करू शकतो, यावर चर्चा केली.

‘ब्रिजिंग होरायझन्’ येथे झालेल्या चर्चेत शिक्षण आणि उद्योग यांच्यातील सहकार्याची गरज, मनुष्यबळाच्या गरजेनुसार शिक्षणाला जोडण्यात आली. गोवा सरकारचे आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीई अँड सी) खाते, कौशल्य विकास आणि नवोपक्रमाला चालना देऊन, या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे.