गोवा खबर : राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी पणजीतील मिनेझीस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिगन्सने आयोजित केलेल्या व्यावसायिक पुरस्कार सोहळ्यात विविध व्यावसायामध्ये कोकणी भाषेचा प्रसार करण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला.
यावेळी एंड रोटरीयन एडब्रोना वालादारीस, क्लबाचे अध्यक्ष रोटरीयन राज खलप, व्यावसायिक सेवा संचालक रोटरीयन सुमेध नाईक आणि क्लबाचे सचिव रोटरीयन परेश रिवणकर उपस्थित होते.
उपस्थितांसमोर बोलताना राज्यपालांनी रोटरी क्लब ही सेवाभिमुख संस्था असल्याचे सांगितले. रोटरी क्लब हा देशभर पसरलेला आहे जो सर्वसामान्यांच्या भल्यासाठी समतोल सेवेचा कार्यक्रम तयार करतो असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांनी रोटरी क्लबाच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि भारतभर उत्कृष्ट सेवा देत असल्याचे सांगितले. चांगली सेवा देण्यासाठी सदर क्लब समर्पित भावनेने काम करीत असल्याचे ते म्हणाले. रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिगन्सच्या सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी विविध मान्यवरांचा राज्यपालांहस्ते स्मृती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
व्यावसायिक सेवा संचालक रोटरीयन सुमेध नाईक यांनी व्यावसायिक पुरस्कार सोहळ्याचा उद्देश सांगितला. क्लबचे सचिव रोटरीयन परेश रिवणकर यांनी आभार मानले.