गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात भोपाळ येथे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद (GIS) 2025 चे उद्धाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी या कार्यक्रमात येण्यासाठी त्यांना विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दहावी आणि बारावी इयत्तांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कार्यक्रमाच्या मार्गावर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांना असुविधा होऊ नये म्हणून विलंबाने आल्याचे त्यांनी सांगितले.
राजा भोज यांच्या भूमीमध्ये गुंतवणूकदार आणि व्यवसाय क्षेत्रातील अग्रणी यांचे स्वागत करताना आपल्याला अतिशय अभिमान वाटत आहे, असे मोदी म्हणाले. विकसित भारताच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत विकसित मध्य प्रदेश किंवा विकास झालेला मध्य प्रदेश महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मध्य प्रदेश सरकारचे या शिखर परिषदेच्या अतिशय उत्तम आयोजनाबद्दल अभिनंदन केले.

मध्य प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे पाचव्या क्रमांकाचे राज्य असल्याचे नमूद करत मोदी म्हणाले, “ मध्य प्रदेश हे कृषी आणि खनिजांसाठी भारतातील अग्रणी राज्यांपैकी एक आहे.” मध्य प्रदेशला जीवन दायिनी नर्मदा नदीचे वरदान लाभले आहे आणि मध्य प्रदेशमध्ये भारतातील सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत आघाडीच्या पाच राज्यांपैकी एक बनण्याची क्षमता आहे, यावर त्यांनी भर दिला.
“वस्त्रोद्योग, पर्यटन आणि तंत्रज्ञान क्षेत्रे भारताच्या विकसित भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील आणि कोट्यवधी नवीन रोजगार निर्माण करतील”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की भारत कापूस, रेशीम, पॉलिस्टर आणि रेयॉनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र कोट्यवधी लोकांना रोजगार प्रदान करते आणि भारताकडे वस्त्रोद्योग क्षेत्रात समृद्ध परंपरा, कौशल्ये आणि उद्योजकता आहे असे त्यांनी नमूद केले. मध्य प्रदेश ही भारताची कापसाची राजधानी असून देशातील सेंद्रिय कापसाच्या पुरवठ्यात त्याचा वाटा सुमारे 25 टक्के आहे आणि तो तुतीच्या रेशीमचा सर्वात मोठा उत्पादक आहे. तसेच राज्यातील चंदेरी आणि माहेश्वरी साड्यांना मोठी मागणी असून त्यांना जीआय टॅग मिळाला आहे असे त्यांनी सांगितले. या क्षेत्रातील गुंतवणूक मध्य प्रदेशच्या कापड उद्योगाला जागतिक स्तरावर ठसा उमटवण्यात मोठ्या प्रमाणात मदत करेल यावर त्यांनी भर दिला.
लाल किल्ल्यावरून केलेल्या निवेदनाचा पुनरुच्चार करत, गुंतवणूक करण्यासाठी आणि मध्य प्रदेशात अधिकाधिक गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे सांगून पंतप्रधानांनी भाषण समाप्त केले.मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई छगनभाई पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.