गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे भारत ऊर्जा सप्ताह 2025 मध्ये आपले विचार मांडले. यशोभूमी येथे उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी अधोरेखित केले की इथे उपस्थित असलेले सर्वजण केवळ ऊर्जा सप्ताहाचा भाग नाहीत तर भारताच्या ऊर्जा महत्त्वाकांक्षेचे अविभाज्य घटक आहेत.
मोदी म्हणाले, भारत केवळ आपल्या विकासालाच नाही तर जगाच्या विकासालाही चालना देत आहे आणि यात ऊर्जा क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारताच्या ऊर्जा महत्त्वाकांक्षा पाच स्तंभांवर आधारित आहेत यावर त्यांनी भर दिला. यामध्ये संसाधनांचा वापर, प्रतिभावंतांमधील नवोन्मेषाला प्रोत्साहन, आर्थिक सामर्थ्य आणि राजकीय स्थैर्य, सामरिक भौगोलिक स्थिती जी ऊर्जा व्यापार आकर्षक तसेच सुलभ बनवत आहे आणि जागतिक स्थैर्याप्रति वचनबद्धता यांचा त्यांनी उल्लेख केला. या घटकांमुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
गेल्या दशकभरात भारताने दहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे, असे मोदी यांनी नमूद केले. भारताची बिगर -जीवाश्म इंधन ऊर्जा क्षमता तिप्पट झाली आहे आणि पॅरिस कराराची उद्दिष्टे साध्य करणारा भारत हा जी 20 समूहातील पहिला देश आहे असे ते म्हणाले.इथेनॉल मिश्रणातील भारताच्या उपलब्धींचा पंतप्रधानांनी उल्लेख केला . सध्याचा इथेनॉल ब्लेडिंगचा दर एकोणीस टक्के आहे ज्यामुळे परकीय चलनाची बचत झाली आहे , शेतकऱ्यांसाठी भरीव महसूल निर्मिती झाली आहे आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाली आहे.ऑक्टोबर 2025 पर्यंत वीस टक्के इथेनॉल अनिवार्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भारत आपल्या हायड्रोकार्बन संसाधनांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याच्या दृष्टीने सातत्याने सुधारणा करत आहे असे अधोरेखित करून, मोदी म्हणाले की प्रमुख शोध कार्य आणि वायू संबंधित पायाभूत सुविधांचा व्यापक विस्तार वायू क्षेत्राच्या वाढीत योगदान देत आहे आणि भारताच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा वाढवत आहे. त्यांनी नमूद केले की भारत सध्या चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रिफायनिंग हब आहे आणि क्षमता 20 टक्क्यांनी वाढविण्याच्या दिशेने काम करत आहे.
चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात हरित ऊर्जेला पाठिंबा देणाऱ्या अनेक घोषणांचा समावेश आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी वृद्धीला चालना देणाऱ्या आणि निसर्गाला समृद्ध करणाऱ्या ऊर्जानिर्मिती पर्यायांची उपलब्धता वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. हा ऊर्जा सप्ताह या दिशेने भक्कम फलनिष्पत्ती देणारा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.