गोवा खबर : नवी दिल्ली येथील कर्तव्यपथ येथे झालेल्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात गोवा राज्याचा चित्ररथ सादर करण्यात आला. “स्वर्णिम भारत, विरासत आणि विकास” (सुवर्ण भारत, वारसा आणि विकास) या संकल्पनेवरील चित्ररथाव्दारे संगीत आणि नृत्याच्या थेट सादरीकरणाद्वारे गोव्याची समृद्ध संस्कृती, संगीताचा वारसा आणि प्रगतीचे दर्शन सादर करण्यात आले.
गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्ररथास प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला.
राज्याच्या कलात्मक वारशाचे प्रदर्शन करणाऱ्या कावी कलेने सुशोभित केलेल्या मंदिराच्या दर्शनी भाग, मंदिराच्या वर दिवज धारण करणारी एक पारंपारिक महिला – एक प्रतीकात्मक मातीचा दिवा – गोव्याची सांस्कृतिक ओळख आणि पूर्वजांच्या परंपरा दर्शविल्या आहेत. तसेच ऐतिहासिक आग्वाद किल्ल्यावरील दीपगृहाचा देखावा, गोव्यातील पर्यटन स्थळाचे दर्शन घडविणाऱ्या साहस पर्यटन, जल क्रिडा, जलसफर, पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, विंडसर्फिंग, केळी बोट राइड आणि स्कूबा डायव्हिंग यासारखे उपक्रम प्रदर्शित करण्यात आले.

गोव्यातील प्रसिद्ध चित्रकार सुशांत उर्फ राजा खेडेकर यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या चित्ररथासाठी डॉ. साईश देशपांडे यांनी संगीत दिले आहे. दिनेश प्रियोळकर यांच्या नेतृत्वाखाली नृत्य सादर करण्यात आले. निषाद यांचे नृत्यदिग्दर्शन लाभले. संगीता आणि मिस अवनी खेडेकर यांनी वेशभूषा केली. पांडुरंग शेट, सुरेश वरेकर, वल्लभ चारी, प्रल्हाद शिलकर आणि इतरांसह कुशल कारागीर आणि फॅब्रिकेटर्सच्या संघाने चित्ररथाच्या निर्मितीसाठी योगदान दिले.
या वर्षी कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन संचलनात केंद्रीय मंत्रालयासह १६ राज्ये आणि संघ प्रदेशांनी सादर केलेल्या चित्ररथाव्दारे आपली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि तांत्रिक कामगिरीचे प्रदर्शन सादर करण्यात आले. कर्तव्य पथावरील संचलनानंतर २६ ते ३१ जानेवारी २०२५ या काळात नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित भारत पर्व सोहळ्यात गोव्याचा चित्ररथ प्रदर्शित केला जाईल. भारत पर्व सोहळ्यात गोव्यातील कलाकारांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल.