Connect with us

गोवा खबर

आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात

Published

on

Spread the love

गोवा खबर : संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन येथे गुरुवार, ५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिना (आयडीपीडी-२०२४) निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे राज्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई, राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव ई वल्लवन (आयएएस), राज्य दिव्यांगजन आयुक्तगुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका वर्षा नाईक आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव  ताहा हाजिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच मुंबईच्या अली यावर जंग वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्था ईसी-गोवाचे प्रभारी अधिकारी डॉ. राजू आरख, प्रा. डॉ. मॅथ्यू मार्टिन, गोवा विद्यापीठातील मनोहर पर्रीकर स्कूलच्या सहाय्यक प्राध्यापक संस्कृती अय्यर, आणि डॉ. आसावरी शिंदे आदी मान्यवरही या कार्यक्रमात उपस्थित होते.
याप्रसंगी दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याहस्ते प्रसिद्ध लेखिका, कवयत्री व कलाकार फ्रेडरिका मिनेझिस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पर्वरीतील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्येकेशनमधील १० वर्षीय विद्यार्थी एथन ए. सेबेस्टियन यालाही मार्शल आर्टमधील कामगिरीबाबत गौरविण्यात आले. स्पेनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली होती.  देशाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला ऑटिस्टिक स्पर्धक म्हणून देशाच्या क्रीडाक्षेत्रात त्याने आपले नाव कोरले आहे.
यावेळी बोलताना राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी गोव्यातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन उंचावण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
हा महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी पुढे आलेल्या विविध उद्योजक, व्यावसायिकांचे त्यांनी कौतुक केले. दिव्यांगजनांच्या हितासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आज आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते आहे. ही फक्त सुरुवात आहे. पुढील आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनापर्यंत या संस्था समाजाला भरभरून देतील, अशी आम्हाला खात्री आहे, असेही पावसकर म्हणाले.
राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका श्रीमती वर्षा नाईक यांनीही दिव्यांगजन कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अथक प्रयत्नांची प्रशंसा केली. स्वयंसेवी संस्थांनी केलेले कार्य दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे. या संस्थांना त्यांचे हे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी आपला विभाग वचनबद्ध आहे. गोव्यातील दिव्यांग व्यक्तींना समान संधी आणि सर्वसमावेशक समाज मिळावा यासाठी आम्ही एकत्रितपणे सक्रियपणे काम करत आहोत, असे श्रीमती नाईक म्हणाल्या.
दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणाबाबत निधी उभारण्यासाठी या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कलाकार मदन शर्मा यांनी रेखाटलेल्या चित्रकृतींचा लिलाव करण्यात आला. या चित्रकृतींच्या खरेदीसाठी कलारसिकांनी गर्दी केली होती. तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.