गोवा खबर : लाच प्रकरणात अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांना न्यूयॉर्कच्या न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांना तत्काळ अटक करावी, तसेच या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मोदींच्या आशीर्वादाने 50 टक्के दर वाढवून अदानी भारतात कोळसा आयात करत आहेत व तो राज्यांना दिला जात आहे, असा आरोप केला. अदानी कंपनीने विमानतळे, बंदरे, प्रसारमाध्यमे, सिमेंट प्रकल्प यात प्रवेश केला आहे. राज्य सरकारने कोळशावर 2 टक्के अधिभार लावला होता. तो कोणाच्या सांगण्यावरून कमी करून 0.5 टक्क्यांवर आणला, हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला सांगायला हवे, असे आव्हान पाटकर यांनी दिले.
दरम्यान, पाटकर यांच्या आरोपांसंदर्भात बोलताना प्रदेश भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून स्पर्धा सहन करावी लागत आहे. आपले पद राखण्यासाठी ते काँग्रेसकडून पसरवल्या जात असलेल्या खोट्या बातम्यांना पाठिंबा देत आहेत.
जो आरोप झाला आहे, त्यावर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी त्या संबंधित कंपनीची आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी व एकूणच पक्ष या विषयी करीत असलेले आरोप हे हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली.