गोवा खबर : आपण वेगवान युगात जगत आहोत. गती जीवनाच्या विविध पैलूंमध्ये प्रगतीवर लक्षणीय परिणाम करू शकते, असे मत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त आज राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केरळ येथील कोट्टकल्ल आर्य वैद्य शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पीएम व्हेरियर, तामिळनाडू कोईम्बतूर येथील आर्य वैद्य फार्मसीचे व्यवस्थापकीय संचालक देविदास वरीयर तसेच पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा उपस्थित होते.
सुरुवातीला राज्यपालांसह गोव्याच्या प्रथम महिला रीता पिल्लई व मान्यवरांनी चर्च,श्रीगणेश मंदिर आणि गोशाळेत पंतप्रधानांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
राज्यपालांनी वृक्ष उपचार आणि पुनरुज्जीवनाची पारंपारिक पद्धत अजूनही जगाला फारशी परिचित नाही आणि त्यामुळे पारंपारिक पद्धती वापरून जुनी झाडे वाचवण्याचे ध्येय म्हणून ही अनोखी वृक्ष चिकित्सा राजभवनात दाखविणे योग्य ठरेल, असे सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आणि ते आपल्या देशासाठी शक्ती आणि दूरदृष्टीचे दीपस्तंभ असल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वाने भारताला केवळ आर्थिक विकास आणि तांत्रिक प्रगतीच नव्हे तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे सार पुनरुज्जीवित आणि जतन करण्याच्या दृष्टीने भारताला अधिक उंचीवर नेले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राजभवनाच्या अनोख्या उपक्रमांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गोव्याचे पर्यावरण जतन करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि आपल्या प्राचीन वारशाच्या ज्ञानाशी आपल्याला पुन्हा जोडणे हे राज्यपालांचे सर्वात मोठे योगदान आहे.
मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांना राज्यातील पारंपरिक जुन्या वृक्षांचे जतन करण्याचे आवाहन केले.
राज्यपालांचे सचिव एमआरएम राव यांनी स्वागत केले. राज्यपालांचे विशेष अधिकारी आर. मिहीर वर्धन यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. पी. राधाकृष्णन यांनी वृक्ष आयुर्वेदावर चर्चा केली.