गोवा खबर : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने राज्यातील आपचे आमदार, नेते, कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. शुक्रवारी पणजीत आपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत हा सत्याचा व लोकशाहीचा विजय आहे, असे पदाधिकार्यांनी सांगितले.
यावेळी आमदार वेन्झि व्हिएगस, आमदार क्क्रुझ सिल्वा, वाल्मिकी नाईक, रामराव वाघ तसेच इतर नेते उपस्थित होते.
व्हिएगस म्हणाले, भाजपने सीबीआय तसेच इतर सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. केजरीवाल भाजपची अनेक प्रकरणे बाहेर काढतील व लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसेल, या भीतीने षड़यंत्र रचून केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.
आमच्या पक्षाचे समाज कार्य सुरूच राहणार आहे. आता विविध राज्यात होणार्या निवडणुकांमध्ये आप पक्ष सक्रिय असणार आहे. गोव्यातील आप पक्ष बळकट केला जाईल, असे व्हिएगस यांनी सांगितले.
केजरीवाल यांनी केंद्र सरकारचे अनेक घोटाळे समोर आणले होते म्हणून भाजपकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले, असे वाल्मिकी नाईक म्हणाले.