नैसर्गिक आपत्तीत सापडलेले शिंदे यांचे घर एका महिन्यात पूर्ण
गोवा खबर : भुईपाल कॉलनी येथे जोरदार पावसामुळे निर्मला शिंदे यांच्या घराचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे ते घर राहण्यासाठी धोकादायक बनले होते. या घटनेची आमदार डॉ. दिव्या राणे यांनी त्वरित दखल घेतली होती. त्या कुटुंबाला त्यांच्या घराची पुनर्बाधणी करण्याचे वचन पूर्ण करताना एका महिन्यात घराचे बांधकाम करून चतुर्थीपूर्वी शिंदे कुटुंबाला आधार दिला आहे.
सत्तरी तालुक्यातील जनता ही आमच्या कुटुंबाचा भाग असल्याने त्यांच्यावर आलेल्या संकटाला सामोरे जाणे हे आमचे कर्तव्य असल्याचे राणे यांनी सांगितले. त्याच भावनेतून या वर्षी संततधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेल्या जनतेला दिलासा देण्याचे काम आम्ही करत आहोत, असे राणे म्हणाल्या.
भुईपाल कॉलनी येथे गेल्या महिन्यात पावसाच्या तडाख्याने निर्मला शिंदे यांच्या घराचा काही भाग पावसामुळे कोसळून संपूर्ण घर राहण्यासाठी असुरक्षित बनले होते. या घटनेची दखल आरोग्यमंत्री विश्वजित राणे व दिव्या राणे यांनी घेत या कुटुंबासाठी सर्व सोयींनीयुक्त अशा घराची उभारणी केली. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शिंदे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.