Connect with us

गोवा खबर

दोन महिन्यांत एआय अ‍ॅप लाँच करणार; रक्ताचा रिपोर्ट अपलोड करताच लगेच कळेल आजाराचे निदान : राणे

Published

on

Spread the love
गोवा खबर : आगामी दोन महिन्यांत’एआय’वर आधारित अ‍ॅप आणले जाईल. त्या माध्यमातून रक्ताचा रिपोर्ट अपलोड करताच आजाराचे निदान कळेल. आरोग्य क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयक ही संकल्पना राबविणारे गोवा पहिले राज्य ठरेल, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला.
वन भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, ‘गोमेकॉत अनेक नवीन सुधारणा केल्या जातील. त्या अनुषंगाने वरिष्ठ डॉक्टरांची बैठक मी घेतली. दोन्ही जिल्हा इस्पितळांमध्ये टेली आयसीयू संकल्पना राबवली जाईल.’
 ‘एआय अ‍ॅपचा अनेक दृष्टिकोनातून लोकांना फायदा होणार आहे. एखाद्या व्यक्तीचे अचानक वजन कमी झाले, तर ते का कमी झाले, याचे निदानही अचूकपणे केले जाईल. मी स्वतःही हे तपासून पाहिले आहे. लोकांना ही सेवा मोफत मिळणार आहे.’
आरोग्यमंत्री राणे म्हणाले , ‘गोमेकॉत स्ट्रोक येणाऱ्या रुग्णांसाठी ‘कॉयलिंग’ व्यवस्था केलेली आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. एरवी ही उपचारपद्धती अत्यंत महागडी आहे, परंतु रुग्णांना गोमेकॉत त्याचा लाभ मिळत आहे.
गोमेकॉतील वेगवेगळ्या विभागांचे सुपरस्पेशालिटी विभागांमध्ये स्थलांतर केले जाणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत कर्करोग रुणांसाठी मोल्यॅक्युलर लॅबही सुरू करण्यात येईल. त्यामुळे कर्करुग्णांवर उपचार करणे अधिक सोपे होईल. सध्या दोन कॅथलॅब गोमेकॉमध्ये आहे. त्यात आणखी एका कॅथलॅबची भर पडणार आहे.’
दरम्यान, खासगी मेडिकल कॉलेजबद्दल विचारले असता, सध्या तरी कोणताही प्रस्ताव नाही, असे ते म्हणाले.
मंत्री राणे म्हणाले, २५ ते ३५ वर्षे वयाच्या तरुणांना स्ट्रोक येऊ लागला आहे. लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे आजारांमध्ये वाढ झाली आहे. हे प्रमाण चिंताजनक आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन व जागृतीही करावी लागेल. तशी पावले उचलण्यात आलेली आहेत.