गोवा खबर : स्वातंत्र्यदिन हा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे असे सांगून पर्यटन, माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खवंटे यांनी म्हापसा येथे राष्ट्रीय तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जमलेल्यांना शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहण समारंभास कळंगुटचे आमदार मायकल लोबो उपस्थित होते. खवंटे यांनी ‘हर घर तिरंगा’ यासारख्या उपक्रमाने सर्वांसाठी देशभक्तीची भावना तयार केली असे प्रतिपादन केले. स्वातंत्र्यदिन ही आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्या तत्त्वांवर विचार करण्याची स्वातंत्र्यदिन ही चांगली संधी आहे आणि आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची दखल घेतली पाहिजे आणि त्या बदल्यात आपल्या देशाच्या वाढीस योगदान देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

खवंटे यांनी भारताच्या पंतप्रधानांचे स्वप्न असलेल्या ‘विकसित भारत’कडे गोवा वाटचाल करीत आहे असे सांगून त्यांनी पायाभूत सुविधांचा विकास ही काळाची गरज आहे आणि अलिकडच्या वर्षांत गोव्यातील पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, असे सांगितले. खवंटे यांनी गोवा पर्यावरण आणि निरोगीपणा, योग आणि वैद्यकीय आणि अंतराळ पर्यटन यांसारख्या क्षेत्रांवर भर देत आहे यातून रोजगार निर्मिती होत असल्याचे सांगितले. त्यांनी गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी सरकार जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांवर भर देत आहे, असे त्यांनी सांगितले.
१३६४ गोवा पर्यटन हेल्पलाइन नंबर, बीच व्हिजिल ॲप, प्रस्तावित गोवा पर्यटन प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियमन विधेयक, २०२४ यासारख्या उपक्रमांमुळे पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, असे ते म्हणाले.
जुने गोवा प्रदर्शनासाठी पर्यटन सुविधांसाठी पायाभूत सुविधा कशा येत आहेत आणि गोव्याला स्वदेश दर्शन योजनेसारख्या योजनांचा कसा फायदा होत आहे याचा त्यांनी माहिती दिली. त्यांनी गोव्याच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. माहिती तंत्रज्ञान आणि वायफाय नेटवर्क उभारण्यासाठी सरकार काम करीत आहे ज्यामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळेल असे ते म्हणाले.
यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी-३ रोहित कदम, उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर व पांडुरंग गाड, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी व शिक्षक, सरकारी अधिकारी आदी उपस्थित होते.