गोवा खबर : कलम 370 रद्द केल्यानंतरचे जम्मू आणि काश्मीर, भारताच्या भविष्यातील विकासकथेचा पथदर्शक म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले.
कलम 370 रद्द करण्याच्या 5 व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे गेल्या सात दशकांपासून वंचित असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील मोठ्या लोकसंख्येला नागरिकत्वाचे अधिकार मिळाले, असे सिंह यांनी सांगितले.
काश्मिरमधील लोकशाहीबाबत बोलताना सिंह म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या पाकिस्तानी निर्वासितांना सात दशके मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते आणि तरीही इंद्रकुमार गुजराल आणि डॉ. मनमोहन सिंग हे त्यापैकी दोघेजण भारताचे पंतप्रधान बनले.

या प्रदेशातील सुरक्षा आणि शांततेसंदर्भात बोलताना सिंह यांनी टिप्पणी केली की आपण आता दहशतवाद निर्मूलनाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. गेल्या दशकात आणि विशेषत: कलम 370 रद्द झाल्यानंतरच्या गेल्या 5 वर्षांत, केंद्राला दहशतवाद रोखण्यात यश आले आहे, असे सांगत त्यांनी, विशिष्ट पद्धतीने पसरवला जाणारा दहशतवाद कमी झाल्याचे स्पष्ट केले. अलीकडील घटनांबद्दल बोलताना ते म्हणाले, दहशतवाद्यांची पळापळ सुरु असून केवळ अस्तित्व दाखवून देण्यासाठी ते दुर्बळांवर हल्ले करत आहेत, मात्र लवकरच अशा प्रकारांवर देखील नियंत्रण मिळवण्यात येईल.
गेल्या दोन वर्षांत सुमारे 2.5 कोटी देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आहे. आपल्या कुटुंबियांसह आणि प्रियजनांसह इथे येणारे लोक म्हणजे शांततेच्या पुनर्स्थापनेचा पुरावाच आहेत. श्रीनगर येथे झालेली G20 ची यशस्वी बैठकही याचीच साक्ष आहे, असे ते म्हणाले.