गोवा खबर:आम आदमी पक्षाचे बाणवलीचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी भाजप सरकारच्या निष्काळजीपणा आणि निष्क्रियतेमुळे बाणावलीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची घणाघाती टीका यांनी मंगळवारी केली.
विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, व्हिएगस यांनी बाणावलीतील पूरसदृश्य परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. सावंत सरकारने बाणावलीच्या रहिवाशांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचे व्हिएगस यांनी अधोरेखित केले. वेस्टर्न बायपास स्टील्टवर बांधण्याची मागणी गेल्या वर्षीच्या विधानसभा अधिवेशन दरम्यान करण्यात आली होती. हा मुद्दा उपस्थित केला असता अनेक आमदारांचा भक्कम पाठिंबा होता. मात्र सरकारने ही मागणी अमान्य केली.
“सावंत सरकारने त्यांचेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तज्ञ पथकाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी पूर टाळण्यासाठी राखीव भिंती बांधणे, नाले बांधणे, गाळ काढणे आणि साळ नदीचे गाळ काढणे असे सुचविले होते. पण आम्ही तज्ञांचे म्हणणे ऐकतोय का? सरकारच्या दुर्लक्षामुळे बाणावलीतील लोकांना मानवनिर्मित आपत्तीचा सामना करावा लागत आहे”, असा आरोप व्हिएगस यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही. तज्ञांच्या सल्ल्यानुसार काम न केल्याचा थेट परिणाम आहे. भाजप सरकारने तातडीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि पूर टाळण्यासाठी तसेच आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजेत”.