गोवा खबर:पेन्हा-दे-फ्रांका पर्वरी येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात शपथविधी समारंभात मुंबई उच्त न्यायालयाचे न्यायाधीश, ज्येष्ट वकील यांच्या उपस्थितीत न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ज्येष्ठ न्यायमूर्ती महेश सोनक यांनी न्यायमूर्ती वाल्मिकी यांना शपथ दिली.
न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस हे गोवा वेल्हा या गावचे आहेत. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्राच्या बार कौन्सिलमध्ये ॲडव्होकेट म्हणून नावनोंदणी केली. त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात नागरी आणि घटनात्मक कायदा, कामगार आणि सेवा कायदा, पर्यावरण कायदा, व्यावसायिक, कर आणि कंपनी कायदे, सार्वजनिक पोर्तुगीज नागरी संहितेशी संबंधित पब्लीक इंटरेस्ट लिटीगेशन मध्ये काम केले. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील जिल्हा आणि सत्र न्यायालये, औद्योगिक न्यायाधिकरण आणि प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्यासमोरही त्यांनी काम केले. ते गोवा हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सचिव होते. १९ जुलै २०२२ रोजी त्यांची मुंबई येथील उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.