गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी कावी कलेच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करून गोवा राज्याला एक अद्भुत वारसा आहे असे सांगितले. चित्रकलेचे पारंपारिक तंत्र असलेल्या कावी कलेचा प्रसार हे कला वारशाच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे असे राज्यपाल म्हणाले.
दोनापावला येथील दरबार सभागृहात राजभवन गोवातर्फे आयोजित कावी कला कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल बोलत होते.
गोव्याच्या प्रथम महिला श्रीमती. के. रीटा श्रीधरन पिल्लई यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
आमदार, श्री दिगंबर कामत, राज्यपालांचे सचिव श्री एम आर एम राव, आयएएस, राज्यपालांचे विशेष अधिकारी श्री आर. मिहीर वर्धन, आयएएस, (निवृत्त), इतिहासकार श्री संजीव सरदेसाई आणि कावी कलाकार श्री सागर नाईक मुळे यावेळी उपस्थित होते.

चार दिवसीय कावी कला कार्यशाळा आयोजित करण्यामागील हेतू व्यक्त करताना राज्यपालांनी कलेचे हे स्वरूप अतिशय अनोखे आहे जे मंदिरे, चर्च आणि गोव्यातील काही वारसा गृहांमध्ये दिसून येते असे सांगितले आणि या कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे.
राज्यपालांनी मन की बात या मासिक कार्यक्रमात या कलेला दिलेल्या महत्त्वावर भर दिला.
यावेळी बोलताना श्री. दिगंबर कामत यांनी राज्यपाल जनतेचे राज्यपाल झाले आहेत असे सांगितले. राज्यपालांच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देताना श्री कामत यांनी राज्यपालांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे असे सांगितले. राजभवन येथे अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करणे हा गोव्यातील कलाकारांसाठी मोठा सन्मान आहे असे श्री कामत म्हणाले आणि ही कला जिवंत ठेवण्यासाठी आणि नवोदित कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी राज्यपालांचे कौतुक केले.
राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राज्यपालांचे विशेष अधिकारी श्री आर. मिहीर वर्धन यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी इतिहासकार श्री संजीव सरदेसाई आणि कावी कलाकार श्री सागर नाईक मुळे यांचीही भाषणे झाली.
श्रीमती. मेघा मुखर्जी यांनी सूत्रसंचालन केले तर श्री संदेश गडकरी यांनी आभार मानले.