गोवा खबर:माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार श्री दिगंबर कामत यांनी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत आज राजभवन येथे राज्यपाल निधीतून राज्यातील १६० कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत वितरीत केली.
राजभवनातील नवीन दरबार सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस आणि अतिरिक्त सचिव श्री संजीव सी. गांवस देसाई यावेळी उपस्थित होते.
प्रथम महिला, श्रीमती रिता श्रीधरन पिल्लई या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

सुरवातीस राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थितांसमोर बोलताना श्री. दिगंबर कामत यांनी राज्यातील संकटात सापडलेल्या लोकांच्या वेदना कमी करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी राजभवनचा हा प्रयत्न आहे असे सांगितले.
सर्व रूग्णांच्यावतीने राज्यपालांचे आभार मानून श्री.कामत यांनी समाजातील गरीब व दु:खी घटकाला मदत करणाऱ्या व्यक्तीला मदत करण्यासाठी सर्वशक्तिमान देव सदैव तत्पर असतो असे सांगितले. .
राज्यपालांनी यापूर्वी अनेक स्वयंसेवी संस्थांना भेटी दिल्या होत्या आणि या संस्थांच्या दारात वैयक्तिकरित्या आर्थिक सहाय्य वितरित केले होते. गोवा ग्राम संपूर्ण यात्रेदरम्यान, राज्यपालांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात भेटी दिल्या आणि डायलिसिस, कर्करोग व अन्य रूग्णांना राज्यपालांच्या निधीतून आर्थिक सहाय्य वितरित केले.