गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य सरकारने राबविलेल्या अंतोदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्त्वांच्या प्रसारासाठी प्रसारमाध्यमांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे आज पणजी येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. सावंत यांनी राज्यातील पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार अत्यंत गंभीर आहे असे सांगितले. त्यांच्या कार्यकाळात निवृत्तीवेतन वाढविणे आणि पत्रकारांच्या भल्यासाठी इतर कल्याणकारी योजना यासारखे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठी ई-बाईक खरेदी करण्याची योजना अंतिम टप्प्यात असून ती लवकरच कार्यान्वित होईल अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी धोरणांमधील त्रुटींवर प्रसारमाध्यमांद्वारे टीका केल्याने सरकारला अधिक सुधारणा करण्यास आणि लोकांना चांगले प्रशासन देण्यास मदत होते, त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असते असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे वैयक्तिक फायद्यासाठी सरकारवर आरोप करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे वाईट हेतूवर प्रसारमाध्यमांनी विचार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

पत्रकारितेला नेहमीच आवाजहीन समाजाचा आवाज मानला जातो. समाजाच्या भल्यासाठी मत तयार करण्याची प्रचंड ताकद पत्रकारितेत आहे. सोशल मीडियाचा उदय आणि व्हायरल न्यूज आणि फेक न्यूजच्या वाढीमुळे समाजातील फेक न्यूज ट्रेंडला आळा घालण्यासाठी प्रिंट आणि टीव्ही मीडियाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.

गुजचे अध्यक्ष श्री राजतिलक नाईक यांनी राज्यात पूर्ण पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू करण्याच्या मागणीचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की गोव्यातील तीन महाविद्यालयांनी त्यांच्या संस्थेत हा अभ्यासक्रम आधीच सुरू केला आहे.
याप्रसंगी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रमोद खांडेपारकर यांच्या पत्रकारितेतील असामान्य योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आला. ८१ वर्षांचे श्री. खांडेपारकर यांनी राज्यातील पत्रकारितेची सहा दशकांपूर्वीची परिस्थिती आणि त्यांच्या कारकिर्दीच्या प्रवासातील संघर्ष आणि यशाचे स्मरण केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
तसेच नवहिंद टाइम्सचे संपादक श्री. विजय डिसोझा, गोवन डेलीचे वरिष्ठ पत्रकार, श्री. ऍशले डो रोझारियो, गोमंतकचे वरिष्ठ पत्रकार श्री. शेखर उर्फ विलास महाडिक, गोमंतकचे वरिष्ठ पत्रकार श्री. नरेंद्र तारी, लोकमतचे वरिष्ठ पत्रकार श्री. विठू सुखडकर यांच्या पत्रकारीतेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री अॅशले यांनी आभार व्यक्त करताना सुदृढ समाजाच्या प्रक्रियेत वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या महत्त्वावर भर दिला.
राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा या विषयावरील सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार गोवन वार्ताचे संपादक श्री पांडुरंग गावकर यांना प्रदान करण्यात आला, ग्रामीण पत्रकारितेतील पुरस्कार श्री मुरारी शेट्ये टाइम्स ऑफ इंडिया यांना मिळाला आहे.
महिला आणि बाल सामाजिक विषयावरील पत्रकारितेसाठीचा पुरस्कार प्रुडंट मिडीयाचे श्री विवेक प्रभू यांना प्रदान करण्यात आला. क्रीडा पत्रकारितेतील पुरस्कार श्री मार्कुस मेर्गुलाव, कला आणि संस्कृती पत्रकारितेतील पुरस्कार गोवन वार्ताचे श्री अजय लाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
छाया पत्रकारितेतील पुरस्कार श्री हेमंत परब, शिक्षण पत्रकारितेतील पुरस्कार श्री स्वप्निल तारी यांना प्रदान करण्यात आला. सरकारची प्रगती पत्रकारितेतील पुरस्कार गौरी मळकर्णेकर यांना प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांहस्ते छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.गुजचे अध्यक्ष श्री राजतिलक नाईक यांनी पुरस्कारप्राप्त मानकऱ्यांची ओळख करून दिली.
माहिती संचालक श्री दिपक बांदेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे महत्व प्रतिपादले आणि पत्रकार बांधवांच्या कल्याणासाठी सदर खात्याने अंमलात आणलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
कु. विश्वजा फळदेसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. साहाय्यक माहिती अधिकारी श्री श्याम गांवकर यांनी आभार मानले.