Connect with us

गोवा खबर

पणजी येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’द्वारे मागणी

Published

on

Spread the love
गोव्यात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरणविरोधी कायदा करा !
गोवा खबर: गोव्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी पणजी येथे काढण्यात आलेल्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’द्वारे करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या अंतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या मोर्च्याचे आयोजन केले होते. 
 पणजी येथील आझाद मैदान येथून ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ला धर्मध्वज पूजनाने प्रारंभ झाला.
यानंतर मोर्चा पुढे एम्.जी. रोड, डॉन बॉस्को सर्कल, जुने एज्युकेशन डिमार्टमेंट, कॉफे आराम या मार्गाने गेल्यानंतर मोर्च्याची शेवटी आझाद मैदानावर सांगता झाली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. केंद्रशासनाने राज्यसभेत गोव्यातून वर्ष २०१९ ते २०२१ या २ वर्षांच्या कालावधीत १ सहस्र ४७१ महिला आणि ७९ मुले बेपत्ता झाल्याचे सांगितले आहे. तसेच गोवा सरकारने मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून ८२९ महिला आणि मुले बेपत्ता झाल्याचे आणि यातील ६९५ जणांचा शोध लागल्याचे, तर १३४ अजूनही बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. ही एक गंभीर घटना आहे. गोव्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे. गोव्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी.
अशा प्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत. ‘लव्ह जिहाद’साठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांचीही शासनाने चौकशी करावी आणि त्यात सापडलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी. लव्ह जिहाद प्रकरणांत मदरसे आणि मशिदी यांचा संबंध आढळून आल्यास त्यांवर तत्काळ बंदी घालण्यात यावी. लव्ह जिहादविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. हिंदु जनजागृती समिती यासाठी शासनाला सर्वतोपरी साहाय्य करील. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी गोव्यात धर्मांतर गोवा सरकार खपवून घेतले जाणार नसल्याचे आणि गोमंतकयांनी धर्मांतरविषयाला अनुसरून जागरूक रहाण्याचे आवाहन केले आहे. गोवा सरकारने धर्मांतराची किड समूळ नष्ट करण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सत्यविजय नाईक आणि सौ. शुभांगी गावडे यांनी केले.
मोर्च्यामध्ये  हिंदू रक्षा वाहिनी संघ गोवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा सुरक्षा मंच, राष्ट्रीय बजरंग दल, करणी सेना, राष्ट्रीय हिंदु वाहिनी, गायत्री परिवार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, गोमंतक मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी, आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.