Connect with us

गोवा खबर

फळदेसाई यांच्या हस्ते स्वयंपूर्ण चतुर्थी बाजाराचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर: समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी बचत गट आणि स्थानिक कारागिरांना दीर्घकालीन विश्वासार्हता प्राप्त करण्यासाठी त्यांच्या खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. केपे येथील स्वयंपूर्ण चतुर्थी बाजाराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार हा राज्य सरकारचा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे जिथे स्थानिक कारागीर आणि महिलांना त्यांच्या घरगुती उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते जे ग्रामीण लोकांना खर्‍या अर्थाने स्वावलंबी बनवेल असे ते म्हणाले.

      ग्रामीण स्वयं-मदत गट आणि कारागिरांनी आधुनिक मार्केटिंग आणि पॅकेजिंग कौशल्ये अंगिकारण्याची वेळ आली आहे. या पद्धतीमुळे चांगला व्यवसाय आकर्षित होईल असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.  राज्य सरकार नेत्रावळी येथे कुणबी हस्तशिल्प ग्राम उभारण्याची योजना आखत आहे ज्यामध्ये कुणबी साडी बनविणे आणि इतर हस्तकलेच्या वस्तूंसाठी एक विशेष दालन उभारले जाईल. हे हस्तकला गाव त्याच्या अस्सल उत्पादनांसाठी ओळखले जाईल आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करेल अशी माहिती त्यांनी दिली.

      गोवा अटल ग्राम विकास एजन्सीचे अध्यक्ष श्री सुभाष वेळीप यांनी अशा स्वयंपूर्ण चतुर्थी बाजारामुळे अधिकाधिक ग्रामीण महिलांना त्यांची कौशल्ये दाखविण्यासाठी आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे सांगितले.

       ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत चालणाऱ्या या स्वयंपूर्ण चतुर्थी बाजारात विविध बचत गट आणि वैयक्तिक कारागिरांनी गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान आवश्यक असलेले विविध खाद्यपदार्थ आणि हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन केले आहे. स्वयंपूर्णा चतुर्थी बाजार हा मडगाव केटीसी बसस्थानकावर होणार असून त्यात २९ ते ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत माटोळीच्या सजावटीच्या वस्तू आणि इतर हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन करण्यासाठी नेत्रावळी येथील बचत गट आणि व्यक्ती सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. केपेच्या नगराध्यक्षा श्रीमती. सुचेता शिरवईकर, प्रकल्प संचालक, अटल ग्राम विकास यंत्रणा श्री. विजय सक्सेना व इतर यावेळी उपस्थित होते.