गोवा खबर:देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे ‘इंडिया-१९४७ ते आतापर्यंत’ या विषयावर आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत व्ही.एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाचे विद्यार्थी सचिन पाणिकर आणि समृद्धी राऊत यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.
कार्यक्रमाला यावेळी माहिती अधिकारी श्री. प्रकाश नाईक, सहाय्यक माहिती अधिकारी श्री. श्याम गावकर आणि क्विजमास्टर श्री. नागेश सरदेसाई उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माहिती अधिकारी श्री. प्रकाश नाईक यांनी स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक केले व ते म्हणाले, की यापूर्वी विविध पैलूंवरील माहिती प्रसारित करण्यासाठी राज्य सरकारची नोडल एजन्सी असलेल्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने, विविध विषयांवर प्रश्नमंजुषा स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्या होत्या, ज्यात सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती प्रसारित करणे आणि शासनाच्या कल्याणकारी उपायांबद्दल जनजागृती करणे, यासह विविध विषयांवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. श्री. नाईक म्हणाले, संवादाच्या विविध पद्धतींचा पुरेपूर वापर करण्यासोबतच, अशा प्रश्नमंजुषा स्पर्धा, पथनाट्य आणि प्रचार मोहिमेद्वारे पारंपारिक पद्धतीने माहिती प्रसारित करून, सरकारच्या उपलब्धी आणि योजनांबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे.

श्री. नाईक म्हणाले, की यापूर्वी विभागाकडून आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील छुप्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यास आणि स्पर्धेच्या विषयावर नाविन्यपूर्ण प्रबोधन करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध झाले.

माहिती अधिकार्यांनी पुढे नमूद केले की, भारत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ ‘इंडिया १९४७ ते आतापर्यंत’ या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवरही त्यांनी भाषण केले, ज्याचा उद्देश जनतेमध्ये देशभक्ती आणि आपली मातृभूमी भारताप्रती त्यांची वचनबद्धतेची भावना जागृत करणे आहे. ते म्हणाले, भारतात विविधतेमध्ये असलेली एकता, विविध धर्माच्या लोकांमधील बंधुत्वाचे बंध दृढ होण्यास मदत करते ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता मजबूत होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी यांनी द्वितीय, धेंपे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, पणजी यांनी तृतीय, सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा आणि गोवा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग फर्मागुडी यांना अनुक्रमे चौथे आणि पाचवे बक्षीस प्राप्त झाले.
सहाय्यक माहिती अधिकारी श्री. श्याम गावकर यांनी स्वागत व आभार व्यक्त केले. माहिती सहाय्यक, कु. रंजना मळीक, हिने सूत्रसंचालन केले.