Connect with us

गोवा खबर

“स्वयंपूर्ण गोव्याचे ध्येय साकार करण्याच्या दिशेने मत्स्योध्योग क्षेत्राला बळकट करण्यास महत्त्वाचे पाऊल :मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Published

on

Spread the love

संशोधन आणि शाश्वत मत्स्योध्योग मजबूत करण्यासाठी गोवा विद्यापीठ आणि मत्स्योध्योग संचालनालय एकत्र

गोवा खबर:वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत मत्स्योध्योग विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, गोवा विद्यापीठ आणि मत्स्योध्योग संचालनालयाने आज गोवा विद्यापीठात ‘मत्स्य संधान क्षेत्रम’ कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सहकार्याचा उद्देश ज्ञान-आधारित उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधन मजबूत करणे, नवोपक्रम आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे, तसेच गोव्याच्या मच्छीमार समुदायासाठी उत्तम संधी निर्माण करणे हा आहे.

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “मत्स्योध्योग क्षेत्र हे गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीचा अविभाज्य भाग असून, अन्नसुरक्षा आणि उपजीविकेला आधार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असे सांगितले गोवा विद्यापीठ आणि मत्स्योध्योग संचालनालय यांच्यातील भागीदारीचे कौतुक करताना त्यांनी यामुळे या क्षेत्रात संशोधन, नवोपक्रम, कौशल्य विकास आणि शाश्वत वाढीला चालना मिळेल असे सांगितले. त्यांनी मत्स्योध्योग संचालनालयाला गोव्याच्या पारंपरिक मासेमारी पद्धती आणि सांस्कृतिक वारसा जतन करताना स्थानिक तरुण आणि मच्छिमारांसाठी प्रशिक्षणाच्या संधी अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. मत्स्योध्योग क्षेत्राला बळकट करणे हे स्वयंपूर्ण गोवा घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

शिक्षण संस्था आणि सरकार यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, या कार्यक्रमात ‘मत्स्य संधान क्षेत्रम’ ॲपचे अनावरणही करण्यात आले. हे ॲप संभाव्य मासेमारी क्षेत्र मार्गदर्शन ॲप्लिकेशन असून, उपग्रह निरीक्षणे, सागरी माहिती आणि प्रगत डेटा विश्लेषणाचा वापर करून मच्छिमारांना वैज्ञानिक मार्गदर्शन देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. हे ॲप्लिकेशन मच्छिमारांना संभाव्य मासेमारी क्षेत्रे ओळखण्यास, शोध वेळ कमी करण्यास, इंधन वापर आणि परिचालन खर्च कमी करण्यास, चांगल्या मासेमारीची शक्यता सुधारण्यास आणि अधिक सुरक्षित व कार्यक्षम मासेमारी कार्यांना सक्षम करण्यास मदत करण्यासाठी तयार केले आहे.

ज्ञान-आधारित आणि शाश्वत नील अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उपक्रम, मत्स्योध्योग क्षेत्रासाठी व्यावहारिक, तंत्रज्ञान-आधारित उपाय विकसित करण्यामध्ये शैक्षणिक संस्था आणि सरकारी खात्यांमधील सहकार्याची क्षमता दाखविते. वैज्ञानिक संशोधनाचे क्षेत्रीय स्तरावरील समर्थनामध्ये रूपांतर करून, ही भागीदारी सागरी संसाधनांच्या जबाबदार आणि कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक मच्छीमार समुदायासाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांना स्मृतिचिन्हेही प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला मत्स्योध्योग मंत्री श्री नीळकंठ हळर्णकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल बी. मेनन, कुलसचिव, गोवा विद्यापीठ श्री सुंदर एन. धुरी, अध्यक्ष, गोवा राज्य संशोधन प्रतिष्ठान प्रा. जनार्दन, संचालिका, मत्स्योध्योग संचालिका डॉ. शमिला मोंतेरो, डीन, स्कूल ऑफ अर्थ, ओशन अँड ॲटमॉस्फेरिक सायन्सेस, गोवा विद्यापीठाचे प्रा. अँथनी ए. व्हिएगस, वरिष्ठ सरकारी अधिकारी, गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधी, मत्स्योध्योग क्षेत्रातील सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते