साखळी येथील रवींद्र भवनात हरिपाठ व दिंडी कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन; मुख्यमंत्र्यांनी वाजवली टाळ
गोवा खबर : आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती भक्ती, एकात्मता, शिस्त आणि निस्वार्थ सेवेचा संदेश देणारी एक पवित्र जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आषाढी एकादशी आणि पवित्र पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित हरिपाठ व दिंडी कार्यक्रमात मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले होते.
यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत भजनात तल्लीन होऊन टाळ वाजवत वारकरी संस्कृतीचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला वारकरी दिंडी मंडळांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, स्थानिक भाविक आणि अत्यंत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वारकरी, भाविक आणि नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायाच्या समृद्ध आध्यात्मिक, भक्तिमय आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासाठी रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या १४ दिवसीय विशेष हरिपाठ उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रवींद्र भवन व्यवस्थापन आणि सर्व वारकरी दिंडी मंडळांचे मनापासून अभिनंदन केले. वारकरी परंपरेतील महान मूल्ये समाजाला सातत्याने योग्य प्रेरणा देत असून, ही परंपरा भावी पिढ्यांपर्यंत अखंडपणे पोहोचावी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाला अधिक बळ मिळावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री सावंत यांनी विठ्ठल चरणी व्यक्त केली.