गोवा खबर : भारतीय जनता पार्टीची (BJP) महत्वपूर्ण प्रदेश कार्यकारिणी बैठक उद्या पणजी येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या सोबत आज बैठकीच्या पूर्वतयारीची पाहणी करून आढावा घेतला . नितीन नवीन हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या नंतर होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक आहे.
बैठकी बद्दल बोलताना दामू नाईक यांनी सांगितले की, या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर सविस्तर चर्चा होईल. यापूर्वी मंडळ पातळी, जिल्हा पातळी आणि शक्ती केंद्र स्तरावर झालेल्या बैठकांचा आढावा घेऊन आता राज्य पातळीवर पुढील वाटचालीची रणनीती आखली जाईल
बैठकीला केंद्रीय नेते एल. मुरूगन करणार मार्गदर्शन
या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एल. मुरूगन विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. बैठकीत राजकीय आणि सामाजिक विषयांवर विविध ठराव मांडले जाणार असून, अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाईल.
निवडणुकीसाठी नव्हे, तर नियमित प्रक्रियेचा भाग
“पक्षासाठी निवडणूक ही केवळ एक वेळची गोष्ट नसते,” असे स्पष्ट करत नाईक म्हणाले की, “आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने कधीच विचार करत नाही. आमच्यासाठी हे काम नियमित प्रक्रियेचा एक भाग आहे. एखादी निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही त्याचा उत्सव साजरा करतो आणि त्याच दिवशी संध्याकाळपासून पुढील पाच वर्षांच्या कामाला आणि बैठकांना सुरुवात करतो.”
आमदार, मंत्र्यांसह २०९ पदाधिकारी राहणार उपस्थित
उद्या सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या बैठकीत पक्षाचे आमदार, मंत्री, विविध मोर्च्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्यासह एकूण २०९ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक पूर्णवेळ चालणार असून दुपारी ३ वाजेपर्यंत चालेल, अशी माहितीही त्यांनी दिली.