गोवा खबर : आगामी विधानसभा निवडणूक मी आमच्या रिव्होल्युशनरी गोअन्स (आरजी) पक्षाच्या तिकिटावरच लढणार असून काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या अफवांना काहीही आधार नाही, असे स्पष्ट वक्तव्य आमदार वीरेश बोरकर यांनी पणजीत पत्रकारांशी बोलताना केले.
बोरकर म्हणाले की, माझ्याबाबत विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. मी आरजी पक्षातच राहून काम करत आहे आणि पुढेही तसेच काम करत राहणार आहे. राज्यात वाढत्या विविध प्रश्नांवर आरजी पक्ष सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः राज्यात सुरू असलेल्या अंधाधुंद जमिनीच्या रूपांतराविरोधात पक्ष ठाम भूमिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आम्ही जनतेसमोर हाच मुद्दा ठळकपणे मांडणार आहोत आणि भाजप सरकारविरोधात ठोस भूमिका घेऊन निवडणूक लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, १८ जून रोजी क्रांतीदिनाच्या निमित्ताने आरजीतर्फे शांततापूर्ण ‘क्रांती रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सायंकाळी ४:३० वाजता कदंबा बसस्थानकातून निघून आझाद मैदानावर पोहोचणार आहे. या रॅलीत गोव्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरजी पक्षाचे सर्व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार असून, गोव्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही रॅली महत्त्वाची ठरेल, असा विश्वास बोरकर यांनी व्यक्त केला. या रॅलीदरम्यान विविध स्थानिक प्रश्नांवर जनजागृती करण्यात येणार असून, नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.