Connect with us

गोवा खबर

धारगळ-महाखाजण येथे भीषण अपघातात साळ येथील दाम्पत्य जागीच ठार

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणे तालुक्यातील धारगळ येथील महाखाजण परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. कॉँक्रीट पावडरने भरलेल्या एका भरधाव ट्रकचे अचानक मागील चाक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक थेट महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे डिचोली तालुक्यातील साळ-मधलावाडा येथील रहिवासी रामचंद्र चंद्रकांत राऊत (६३ वर्षे) आणि त्यांच्या पत्नी रेशमा रामचंद्र राऊत यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला.

काही कामानिमित्त पेडणे येथे गेलेले हे दाम्पत्य आपले काम आटोपून घराकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांचा परतीचा प्रवास हाच अखेरचा प्रवास ठरला. प्राथमिक माहितीनुसार, जीए-०३-व्ही-८७७३ क्रमांकाचा कॉँक्रीटचा ट्रक महापाशच्या दिशेने जात होता, तर राऊत दाम्पत्य जीए-०४-एम-८१९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. अचानक ट्रकचे टायर फुटल्याने अनियंत्रित झालेला अवजड ट्रक दुचाकीला जोरदार धडक देऊन थेट अंगावर उलटला, ज्यामुळे या दाम्पत्याला स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, मात्र या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आणि पुढील तपास सुरू केला आहे.

राऊत हे कदंब परिवहन महामंडळातून कंडक्टर पदावरून निवृत्त झाले होते आणि गावात सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी सक्रिय असायचे. त्यांच्या पश्चात दोन अविवाहित पुत्र, भाऊ, भावजय आणि पुतणे असा परिवार आहे. या अकस्मात निधनाने साळ गावावर आणि संपूर्ण पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्रादेवी ते धारगळ महाखाजण हा राष्ट्रीय महामार्गाचा पट्टा दिवसेंदिवस अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनत चालला असून अपुरी सुरक्षा आणि वेगाने धावणाऱ्या जड वाहनांमुळे स्थानिकांमध्ये संताप आहे. प्रशासनाने आतातरी जागे होऊन येथे उड्डाणपूल आणि वाहतूक नियंत्रणाच्या तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.