गोवा खबर : मोर्ले आणि सत्तरी परिसरातील महिला शक्ती, युवा वर्ग आणि नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या उत्साहाने, अपेक्षांनी आणि विकासावरील दृढ विश्वासाने प्रेरणा मिळत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.
“गोव्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास साध्य होणार नाही,” असे मत पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी व्यक्त केले. मोर्ले येथे आयोजित जनसभेला त्या उपस्थित होत्या. या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणे म्हणाले की, सत्तरी तालुक्यात आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि रोजगाराच्या नव्या संधींच्या माध्यमातून विकास प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. सरकारच्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असून विकासाची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत.
‘सेवा, समर्पण आणि अंत्योदय’ या तत्त्वांवर काम करताना विकासाचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तरीचा विकास करताना येथील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वारसा जपत पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करत, जनतेच्या सहकार्याने अधिक सक्षम आणि प्रगत सत्तरी घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मोर्ले येथे झालेल्या या जनसंवाद कार्यक्रमात विकासकामे, रोजगाराच्या संधी आणि स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी विकासाच्या विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करत सरकारच्या कामकाजावर विश्वास दर्शविला.