Connect with us

गोवा खबर

केरळ पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा हायटेक चोरटा गोव्यात जेरबंद; कळंगुटच्या पबमधून फिल्मी स्टाईलने अटक

Published

on

Spread the love

गोवा खबर : केरळ पोलिसांची डोकेदुखी ठरलेल्या आणि अनेक गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेल्या एका अट्टल हायटेक चोरट्याला गोवा पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि फिल्मी स्टाईलने कळंगुटमधील एका हाय-प्रोफाईल पबमधून अटक केली आहे. या सराईत गुन्हेगाराने २७ मे २०२६ रोजी केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील बकेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून प्रवेश केला होता. त्याने सोन्याच्या अंगठ्या आणि हार अतिशय कौशल्याने निवडले, मात्र पैसे देण्याची वेळ आली तेव्हा दुकानदाराला ऑनलाईन पेमेंट यशस्वी झाल्याचा एक बनावट ‘स्क्रीनशॉट’ दाखवून फसवणूक केली आणि दुकानदार काही समजण्याच्या आतच तो सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला होता.

हा आरोपी प्रत्येक चोरीनंतर मोजमजेसाठी थेट गोव्यात येतो आणि चोरीच्या पैशातून कॅसिनो किंवा पार्टी क्लबमध्ये पैसे उडवतो, अशी पक्की माहिती केरळ पोलिसांना मिळाली होती. केरळ पोलिसांकडून ही माहिती मिळताच गोव्यातील स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक दिनेश पिकुळकर आणि हेड कॉन्स्टेबल संदीप मडकईकर यांच्या नेतृत्वाखाली पणजी आणि कळंगुट परिसरात मोठी शोध मोहीम राबवली.

३० मे रोजी हा आरोपी एका पबमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे झडप घालून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे सर्व दागिने जप्त करून त्याला केरळ पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस अधीक्षक (गुन्हे) राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कामगिरी कौतुकास्पद ठरली असून केरळच्या आयपीएस अधिकाऱ्यांनी गोवा पोलिसांचे आभार मानले आहेत.