Connect with us

गोवा खबर

‘मन की बात’ला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; पर्ये आणि वाळपई मतदारसंघात सर्वाधिक उपस्थिती

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३४ व्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाला संपूर्ण गोवा राज्यातून नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून, यामध्ये पर्ये आणि वाळपई मतदारसंघांनी उपस्थितीच्या बाबतीत बाजी मारली आहे. पर्ये मतदारसंघात शंभर टक्के बुथांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे ३,३७५ नागरिकांनी एकत्र येत हा कार्यक्रम ऐकला आणि हा मतदारसंघ संपूर्ण गोव्यात पहिल्या क्रमांकावर ठरला. त्याखालोखाल वाळपई मतदारसंघातही सर्व बुथांवर यशस्वी आयोजन होऊन ३,०५२ जणांच्या उपस्थितीसह या मतदारसंघाने दुसरा क्रमांक पटकावला.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पक्षाने राज्यभरातील एकूण १,७३१ बुथांपैकी १,०८१ बुथांवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले, ज्याचा लाभ ३२ हजारांहून अधिक गोमंतकीयांनी घेतला.

या देशव्यापी उपक्रमात वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. फातोर्डा मतदारसंघात पक्षाचा आमदार नसतानाही ३० बुथांवर तब्बल ९०६ जणांनी हजेरी लावली. मडकई मतदारसंघात स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी कमालीची तत्परता दाखवत अनेक बुथांवर मोठे आयोजन केले.

साखळीत २,२७० तर मांद्रे येथील ४८ बुथांवर १,२३३ नागरिकांची नोंद झाली. साळगाव, पर्वरी, शिवोली आणि वास्को या भागांतही शंभर टक्के बुथ कव्हरेजसह नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, मडगाव, काणकोण आणि दाबोळी सारख्या भाजपचे मंत्री प्रतिनिधित्व करत असलेल्या काही मतदारसंघांमध्ये मात्र नागरिकांची उपस्थिती तुलनेने अत्यंत कमी जाणवली. काणकोणमध्ये ५९ पैकी केवळ ३८ बुथांवर कार्यक्रम झाला आणि फक्त ४७८ जण उपस्थित राहिले, तर मडगावात ४० बुथांवर केवळ ४६५ लोक पोहोचले. धक्कादायक बाब म्हणजे पणजी मतदारसंघात भाजपचे मोठे राजकीय वर्चस्व असूनही अत्यंत निराशाजनक चित्र दिसले, जिथे ३० पैकी केवळ २४ बुथांवर कार्यक्रम झाला आणि अवघ्या २३८ लोकांनी हजेरी लावली. शेजारील ताळगाव मतदारसंघातही ४३ बुथांवर कव्हरेज असूनही केवळ ६७३ लोक उपस्थित होते.