Connect with us

गोवा खबर

काजू महोत्सवाचा दिमाखदार समारोप; तीन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल, तांत्रिक सत्रांतून शेतकऱ्यांना लाभ

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजी कांपाल-पणजी येथील डी. बी. बांदोडकर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘काजू महोत्सवाचा’ (Goa Cashew Fest 2026) रविवारी अत्यंत उत्साहात समारोप झाला. पर्यटनाच्या आमदार आणि गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवाला स्थानिक गोवेकरांसह देश-विदेशातील पर्यटकांनी उदंड प्रतिसाद दिला. गेल्या तीन दिवसांत या महोत्सवात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून, मनोरंजनासोबतच शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर या वेळी भर देण्यात आला.

मनोरंजनाची मेजवानी आणि ताऱ्यांची उपस्थिती

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी जगप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जीगर यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सने तरुणाईला मंत्रमुग्ध केले. यापूर्वी उद्घाटनाच्या दिवशी जोनिता गांधी आणि शनिवारी बेनी दयाल यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची ऊर्जा वाढवली होती. केवळ संगीतच नव्हे, तर फॅशन शो, ऑर्केस्ट्रा आणि गायन अशा विविधांगी कार्यक्रमांनी काजू महोत्सवाची रंगत वाढवली.

स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ

महोत्सवात स्थानिक महिला मंडळांच्या आणि बचत गटांच्या दालनांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते. काजूपासून तयार होणारी विविध उत्पादने, काजू फेणी आणि हुरका यांच्या विक्रीतून स्थानिकांना मोठा आर्थिक लाभ झाला. पर्यटकांनी गोव्याच्या या पारंपरिक पेयाचा आणि खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.

मूल्यवर्धनातून रोजगाराच्या संधी: तज्ज्ञांचे मार्गदर्शन

महोत्सवांतर्गत आयोजित तांत्रिक सत्रात बोलताना भारतीय कृषी संशोधन केंद्राचे माजी शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. देसाई यांनी काजू बोंडाच्या मूल्यवर्धनावर प्रकाश टाकला. केवळ फेणीपुरते मर्यादित न राहता काजू बोंडापासून पौष्टिक खाद्यपदार्थ, ‘प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री काजू अ‍ॅपल क्रंच’ आणि अगदी पर्यावरणापूरक साहित्य तयार करून ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना कशी प्रत्यक्षात आणता येईल, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र-गोवा समन्वय: दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

सावंतवाडीचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही या महोत्सवाला भेट देत गोव्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. कोकणात मोठ्या प्रमाणात काजू बोंडे वाया जातात, याकडे लक्ष वेधत त्यांनी गोवा सरकारशी चर्चा करून या बोंडांचा योग्य वापर करण्याबाबत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याबाबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आफ्रिकन काजूची आयात कमी करण्यासाठी कोकण आणि गोव्यातील उत्पादन वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांसाठी ‘व्हिजन २०२६’

गेल्या चार वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या महोत्सवात यंदा शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली. गोव्यातील काजूला जागतिक स्तरावर ‘ब्रँडिंग’ कसे मिळवून देता येईल आणि उत्पादनाचा दर्जा कसा सुधारता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली. कृषी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनीही या सत्रांचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.