गोवा खबर : राज्यात निर्माण होणाऱ्या तिसऱ्या जिल्ह्यावरून (कुशावती) सध्या राजकीय चर्चा रंगली आहे. या निर्णयाचे समर्थन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विरोधकांना केवळ विरोध न करता रचनात्मक सूचना मांडण्याचे आवाहन केले आहे. धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या मागासलेल्या तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘कुशावती’ जिल्ह्याची निर्मिती मैलाचा दगड ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नमूद केले की, या भागात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे, ज्यांना नव्या जिल्हा रचनेमुळे प्रशासकीय कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. तर आमदार नीलेश काब्राल यांनी नव्या जिल्ह्यात सुसज्ज जिल्हा रुग्णालय, न्यायालये आणि प्रशासकीय संकुले उभारली जाणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल, असे सांगितले.