Connect with us

गोवा खबर

झेडपी निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या

Published

on

Spread the love
  • शनिवारी मतदान; १,२८४ केंद्रांवर ८.६८ लाख मतदार बजावणार हक्क

गोवा खबर : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेला जाहीर प्रचार काल, बुधवारी रात्री १० वाजता संपुष्टात आला. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या मतदानाकडे लागले असून, ५० मतदारसंघांतील २२६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मतमोजणी सोमवारी, २२ डिसेंबर रोजी होणार आहे.

शनिवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी मतपत्रिका आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन निवडणूक कर्मचारी शुक्रवारी सकाळी मतदान केंद्रांकडे रवाना होणार आहेत. राज्यातील ५० मतदारसंघांसाठी १,२८४ मतदान केंद्रांवर एकूण ८,६८,६३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ही निवडणूक पक्षीय पातळीवर होत असल्याने अनेक मतदारसंघांत चुरशीच्या आणि रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही ‘सेमिफायनल’ मानली जात आहे. कवळें, पाळी आदी मतदारसंघांमध्ये केवळ दोनच उमेदवार असल्याने थेट लढत होत आहे, तर ताळगाव मतदारसंघात भाजपसाठी ही निवडणूक एकतर्फी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर गोव्यात १११, दक्षिण गोव्यात ११५ उमेदवार

उत्तर गोव्यात १११, तर दक्षिण गोव्यात ११५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सांकवाळ मतदारसंघात सर्वाधिक ८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. दक्षिण गोव्यातील शिरोडा मतदारसंघात जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांची कन्या गौरी शिरोडकर भाजपकडून रिंगणात आहेत. कुठ्ठाळी मतदारसंघात अपक्ष आमदार आंतोन वास यांची पत्नी मर्सियाना वास अपक्ष म्हणून, तर कोलवाळ मतदारसंघात माजी आमदार किरण कांदोळकर यांची पत्नी कविता कांदोळकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

मतदान व मतमोजणी दिवशी कडक निर्बंध

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कडक आदेश जारी केले आहेत. मतदानाच्या दिवशी, म्हणजेच २० डिसेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत, मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व रेस्टॉरंट्स, बार, चहाच्या टपऱ्या, पान दुकाने, खानावळी, ढाबे तसेच खाद्यगाड्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच २२ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी, मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील खाद्यगृहे सकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत बंद राहतील. याशिवाय मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा दल आणि अधिकृत व्यक्तींना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे आदेश लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.