Connect with us

गोवा खबर

साखळीतील एडीआयपी शिबिरास चांगला प्रतिसाद

Published

on

Spread the love
  • समावेशक विकास उपक्रमांना पाठिंबा दर्शवत मुख्यमंत्री दिव्यांग आयोग कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शिबिरात सहभागी

गोवा खबर : राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांनी हल्लीच साखळीतील रवींद्र भवन येथे एडीआयपी (दिव्यांगजनांसाठी साहाय्यक उपकरणे, साधन खरेदी प्रकल्प) शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या शिबिरास राज्यातील दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांकडून चांगला प्रतिसाद लाभला. हे शिबिर राज्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते.

माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आणि दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी राज्य सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक यांनी लाभार्थी दिव्यांगजनांना आवश्यक सहाय्यक उपकरणांचे वितरण केले. शिबिराला मोठ्या संख्येने दिव्यांग व्यक्तींची उपस्थिती होती.

याप्रसंगी गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, “गोवा राज्य सरकारने नेहमीच दिव्यांग व्यक्तींचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. एडीआयपी कॅम्पसारख्या उपक्रमांद्वारे, आम्ही प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत सहाय्यक उपकरणे आणि साधन पोहोचतील, याची खात्री करत आहोत. समर्पित दिव्यांग विभागाच्या स्थापनेसह, प्रत्येक नागरिकाला सहभागी होण्याची, योगदान देण्याची आणि स्वातंत्र्याचे जीवन जगण्याची संधी मिळेल असे एक समावेशक गोवा राज्य निर्माण करण्याचा आमचा संकल्प या उपक्रमाच्या माध्यमातून बळकट करत आहोत.”

राज्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, “साखळीत आज आयोजित एडीआयपी शिबिरामध्ये उपस्थितांची मोठी संख्या म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या वचनबद्धतेवर व्यक्त केलल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. राज्यातील कोणताही दिव्यांग व्यक्ती मदत, साहाय्यक उपकरणे किंवा सेवांअभावी विकासाच्या प्रवासात मागे राहू नये, हे आमचे ध्येय आहे.”

राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या अढळ पाठिंब्यामुळे आणि आमच्या टीमच्या वचनबद्धतेमुळे, आम्ही एडीआयपी शिबिरांची पोहोच ही अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत निश्चित करणे शक्य होत आहे. सहाय्यक उपकरणे दिव्यांग व्यक्तींसाठी गतिशीलता, संवाद आणि एकूण जीवनाची गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग लाभार्थी व्यक्तीसाठी गतिशीलता, संवाद आणि जीवनमान उचांवण्यासाठी आवश्यक सहाय्यक उपकरणे उपलब्ध करण्याच्या हेतून अशा शिबिरांचे आयोजन आम्ही करत आहोत.”

राज्यभर आयोजित एडीआयपी शिबिरे गोव्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगण्यासाठी आवश्यक असलेली साधने मिळतील याची खात्री करण्याच्या वचनबद्धतेवर भर देतात. एडीआयपी योजना पात्र दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, श्रवणयंत्र, कुबड्या अशी विविध साधने, उपकरणे, साहित्य उपलब्ध करते.

राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ पासून, गोव्यात १३०० हून अधिक लाभार्थ्यांना एडीआयपी योजनेअंतर्गत मदत आणि उपकरणे मिळाली आहेत. राज्यभरात सहाय्यक तंत्रज्ञान अधिक सुलभ बनवण्याचे, दिव्यांग व्यक्तींना अधिक स्वतंत्र आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्याचे आयोगाचे कार्य अशा शिबिरांच्या माध्यमातून यापुढेही चालू राहणार आहे.