Connect with us

गोवा खबर

प्रसारमाध्यमातील वृत्ताची दखल घेत २४ तासांतच दिव्यांग रथ काणकोणमध्ये केला उपलब्ध

Published

on

Spread the love
  • स्पास्टिक सेरेब्रल पाल्सी असलेल्या तरुणासाठी राज्य आयुक्तांनी तत्काळ घरातच दिव्यंगत्व मूल्यांकन चाचणीसह उपचारसुविधा केली सुनिश्चित

गोवा खबर : काणकोण येथील एका तरुणाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तातडीने दखल घेत, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग (गोवा) यांनी तातडीने कारवाई केली.

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५ दरम्यान सुरू करण्यात आलेले मोबाईल आउटरीच युनिट ‘दिव्यांग रथ’ २४ तासांच्या आत १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सदर तरुणाच्या घरी दिव्यंगत्व मूल्यांकन तपासणी आणि उपचार सुविधांसाठी पाठवण्यात आला. या तरुणाची त्याच्या घरामध्येच आरोग्य तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीय मूल्यांकनामध्ये सदर तरुणास स्पास्टिक सेरेब्रल पाल्सी (सीपी) असल्याचे निदान झाले. या रुग्णावर त्याच्या घरामध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत. शरीराचा वरचा भाग आणि कमरेपासूनचा खालचा भागाची हालचाल सुधारणे, स्पास्टिसिटी कमी करणे आणि गतिशीलता वाढवणे या उद्देशाने या तरुणासाठी उपयुक्त व्यायाम उपचार निश्चित करण्यात आला आहे.

याबाबत राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “दिव्यांग व्यक्तींच्या गरजांची तातडीने दखल घेणे आणि व्यक्ती-केंद्रित कृती करणे ही आमची जबाबदारी आहे. गरजू लोकांपंर्यंत तातडीने दिव्यंगत्व मूल्यांकन करणे आणि प्राथमिक उपचार उपलब्धतेची सेवा पोहोचविणे या उद्देशाने दिव्यांग रथची रचना करण्यात आली आहे. काणकोणमध्ये नेमके याचीच प्रचिती आली. सदर तरुणास योग्य उपचार उपलब्ध व्हावेत, नागरी अधिकारांचा लाभ मिळावा आणि त्याच्या कुटुंबाला आवश्यक पाठबळ उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.”

सदर तरुणाला उपचार मिळावेत, त्याला आवश्यक साधन-उपकरणांची उपलब्धता व्हावी आणि यासाठी दिव्यांगजनांसाठीच्या शासकीय योजनांचा लाभ सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त कार्यालय आणि विभागाद्वारे स्थानिक आरोग्यसेवा आणि पुनर्वसन सेवांशी समन्वय साधला जात आहे.

तसेच प्रोवेदोरियाद्वारे चालविल्या जाणाऱ्या राज्यभरातील वृद्धाश्रमांमध्येही दिव्यांग रथ सेवा उपलब्ध केली जात असून, याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना फिजिओथेरपी व आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.

तसेच, ज्यांना घरामध्येच उपचारांची गरज आहे अशा व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबीय फोन क्रमांकाच्या माध्यमातून दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाशी +९१ ८२०८९ ३५१०३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.