गोवा खबर : भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती १५ नोव्हेंबर रोजी राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने मडगाव शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे आठ हजार दुचाकीस्वार यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी दिली.
रवींद्र भवन येथे आदिवासी कल्याण खाते आणि आदिवासी संशोधन संस्थेच्या वतीने झालेल्या मुखिया संमेलनात ते बोलत होते. तवडकर म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावेत, यासाठी विविध कार्यक्रम आणि महासभेचे आयोजन केले आहे.

यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि अँथनी बार्बोझा उपस्थित होते. मडगावातून सुमारे दोन हजार लोक या महासभेला उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.
तवडकर यांनी रवींद्र भवनच्या नूतनीकरणाचीही पाहणी केली आणि ते चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्याचे सांगितले. मडगावचे रवींद्र भवन हे सांस्कृतिकदृष्ट्या केंद्रस्थान आहे, त्यामुळे त्याचे नूतनीकरण आवश्यक होते. हे काम समाधानकारकरीत्या पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.