Connect with us

गोवा खबर

दूधसागर धबधब्यावरील पर्यटन हंगामाला सुरुवात

Published

on

Spread the love
  • अकरा दिवसांत समस्या सोडविण्याचे विनय तेंडुलकर यांचे आश्वासन

गोवा खबर : जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावरील पर्यटन हंगामाला औपचारिक सुरुवात झाली असून, प्रलंबित अडचणी पुढील अकरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन राज्यसभेचे माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी दिले.

दूधसागर ऑपरेटरर्स असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

तेंडुलकर म्हणाले की, दूधसागर पर्यटनातील कायदेशीर आणि तांत्रिक बाबी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपाने निकाली काढल्या जातील. वन्यजीव विभागाकडून पर्यटन हंगाम सुरू करण्यास लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने काही दिवस थांबावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात भाजप केंद्रीय समितीचे अध्यक्ष विलास देसाई, मच्छिंद्र देसाई, बालाजी गावस, गोविंद गावकर, साईश नाईक, अश्विनी देसाई, नीलेश वेळीप आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

तेंडुलकर यांनी शासन आणि टूर ऑपरेटरर्स यांच्यातील प्रश्न अकरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले. अन्यथा, मागण्या मान्य न झाल्यास ऑपरेटरर्सकडून ऑफलाइन पद्धतीने हंगाम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

झेडपीचे माजी सदस्य गोविंद गावकर यांनी सर्व जीप मालकांनी संघटित राहून पर्यटन व्यवसाय संघटनेमार्फत चालवावा, असे आवाहन केले. तर विलास देसाई यांनी ऑनलाइन बुकिंग वेबसाइट पुन्हा ऑपरेटरर्सकडे परत देण्याची मागणी केली.

असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी दोन प्रमुख मागण्या मांडल्या —

1️⃣ गोवा पर्यटन विकास महामंडळाचा (जीटीडीसी) काउंटर बंद करून त्यांचा करार रद्द करावा.
2️⃣ जीटीडीसीच्या ताब्यातील ऑनलाइन बुकिंग वेबसाइट ऑपरेटरर्सकडे परत द्यावी.
पंच अश्विनी देसाई यांनी संघटनेला पूर्ण पाठिंबा देत, शासनाने मागण्या मान्य करून हंगाम सुरळीत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिश नाईक देसाई यांनी केले, तर नीलेश वेळीप यांनी आभार मानले.