-
वाळपईत महिला सबलीकरण कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा
गोवा खबर : नगरगाव येथे आयोजित महिला सबलीकरण आणि सेवा पंधरवडा कार्यक्रमात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त बोलताना म्हटले की, “घरातील स्त्री सशक्त असेल, तर परिवार सुदृढ होतो. स्त्री आजारी पडली तर संपूर्ण घर आजारी पडते. त्यामुळे महिलांनी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.”
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचा मध्यप्रदेशातून थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्यानंतर दुर्गा मूर्ती पूजन व सामुदायिक आरती करून पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे, केंद्रीय आरोग्य विभागाचे अधिकारी, गोवा आरोग्य खात्याचे अधिकारी तसेच हजारो महिला उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, घरातील स्त्री ही कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज असली पाहिजे. त्यासाठी तिचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.
“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या मूलमंत्रावर पंतप्रधान मोदी कार्य करत आहेत. गोरगरीब महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन होत आहे. महिलांचे सबलीकरण झाले, तर देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल,” असे नाईक यांनी नमूद केले.