Connect with us

गोवा खबर

दीपावलीनिमित्त ‘किल्ले बनवा स्पर्धा’

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील युवकांमध्ये शौर्यजागृती निर्माण करण्यासाठी आणि इतिहास जतन करण्याच्या उद्देशाने अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेतर्फे दीपावलीनिमित्त राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत आयोजन समितीचे अध्यक्ष संकेत आर्सेकर, उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, सचिव सत्यविजय नाईक, खजिनदार सुजय देसाई, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा दोन विभागांत होणार आहे – समुदाय स्तर व वैयक्तिक घरगुती स्तर.

समुदाय स्तरावरील स्पर्धा उत्तर व दक्षिण गोवा जिल्हास्तरावर तर घरगुती स्तरावरील स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. समुदाय स्तरावरील किल्ल्याचा किमान आकार ४ चौ. मी. असणे आवश्यक आहे. विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, दुसरे ३० हजार रुपये, तिसरे २० हजार रुपये आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांची १० सन्माननीय पारितोषिके दिली जातील.

घरगुती स्तरावरील स्पर्धेसाठी किल्ल्याचा कमाल आकार १ चौ. मी. ठेवण्यात आला आहे. या गटात प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, दुसरे ४ हजार रुपये, तिसरे ३ हजार रुपये, तर प्रत्येकी २ हजार रुपयांची तीन सन्माननीय पारितोषिके दिली जाणार आहेत.

घरगुती स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार असून, नोंदणीची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. किल्ला तयार करण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर असून परीक्षणाची सुरुवात २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

युवा पिढीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यपूर्ण इतिहास पोहोचावा, हा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सत्यविजय नाईक किंवा सुजय देसाई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.