गोवा खबर:सांगोल्डा येथील शांतादुर्गा देवस्थान सभागृहात भाजप महिला मोर्चाच्या वतीने श्रावण मास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी “श्रावण मास हा सनातन संस्कृती जपणारा महिना असून, महिलांनी आजवर जसे जपले आहे तसे भविष्यातही जपले पाहिजे” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सुलक्षणा सावंत, केदार नाईक, जि.प. सदस्य संदीप बांदोडकर, कार्तिक कुडणेकर, सरपंच नीता कांदोळकर, रेश्मा बांदोडकर, राजेश कळंगुटकर, सुश्मिता पेडणेकर, लुकास रेमेडीयस, शुभम राव देसाई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दामू नाईक म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली आहे. सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यायला हवा. या योजनांमुळे सामान्य माणसाचे जीवनमान उंचावते.”
विरोधकांकडून बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्याच्या निर्णयावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना नाईक म्हणाले, “हे सरकार सामान्यांचे हित जपणारे आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही देणगीच आहे.”
कार्यक्रमात महिलांसाठी खेळ, स्वयंपाक स्पर्धा, पारंपरिक नृत्य सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. ‘गोवन व्हनी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाला रंगत आणली.