गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित कृषी संकल्प अभियानाला संबोधित केले. याप्रसंगी ते म्हणाले की, विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे तसेच कृषी विकासाला पाठबळ देण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, मान्सूनच्या प्रारंभासोबत आणि खरीप हंगामाची तयारी सुरू होण्यासोबत, पुढील 12 ते 15 दिवसांमध्ये वैज्ञानिक, तज्ञ, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी यांची 2000 पथके 700 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रवास करतील आणि गावोगावी लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. भारताच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्याप्रति त्यांच्या समर्पणाची दखल घेत , त्यांनी सर्व शेतकरी आणि या पथकांमधील सहभागींना शुभेच्छा दिल्या.
शेती हा पारंपारिकपणे राज्याचा विषय आहे, प्रत्येक राज्य धोरणे आखते आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पुढाकार घेते हे अधोरेखित करून, वेगाने बदलणाऱ्या काळासोबत, भारताच्या कृषी क्षेत्रातही लक्षणीय परिवर्तनाची आवश्यकता आहे यावर मोदी यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की भारतीय शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे, धान्याची कोठारे भरली आहेत, परंतु बाजारपेठेतील गणिते आणि ग्राहकांची प्राधान्ये देखील बदलत आहेत. राज्ये आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने कृषी व्यवस्थांमध्ये आधुनिक सुधारणा घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले. मोदी यांनी नमूद केले की या अभियानांतर्गत ,वैज्ञानिक पथके प्रयोगशाळेमधून शेतावर जातील , शेतकऱ्यांपर्यंत व्यापक माहिती पोहोचवतील आणि त्यांना प्रगत कृषी ज्ञानाने सुसज्ज करतील. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही पथके तयार राहतील यावर त्यांनी भर दिला.
भारताच्या कृषी वैज्ञानिकांनी गेल्या काही दशकांमध्ये केलेली महत्त्वपूर्ण संशोधन प्रगती, शेतीच्या परिणामांवर त्यांचा सकारात्मक परिणाम अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी नवीन तंत्रांचा यशस्वी प्रयोग करून उल्लेखनीय उत्पादन मिळवणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचे कौतुक केले. वैज्ञानिक संशोधन आणि यशस्वी शेती पद्धती व्यापक शेतकरी समुदायापर्यंत पोहचणे अत्यावश्यक आहे याचे महत्त्व अधोरेखित कताना, पंतप्रधानांनी नमूद केले की प्रयत्न सुरु आहेत मात्र आता नवीन उर्जेने या उपक्रमांना गती देण्याची गरज आहे.
“विकसित कृषी संकल्प अभियान, ज्ञानाची पोकळी भरून काढण्यासाठी एक मौल्यवान संधी प्रदान करते. या अभियानामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी ज्ञानाचा लाभ घेता येईल”,असे पंतप्रधान म्हणाले.
“भारताचे कृषी क्षेत्र, विकसित भारताची कोनशिला बनली पाहिजे”, अशा शब्दात मोदी यांनी या अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांनी भेट देणाऱ्या शास्त्रज्ञांना भेट देण्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी या शास्त्रज्ञांना प्रश्न विचारण्यासाठी आणि मौल्यवान ज्ञान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी आपल्या ध्येयाचे महत्त्व ओळखावे असे आवाहन त्यांनी केले. आपली वचनबद्धता नियमित सरकारी कामाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सेवेच्या भावनेतून प्रतिबिंबित झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना व्यापकपणे सोडवण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या मौल्यवान सूचनांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. “विकसित कृषी संकल्प अभियान भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करील तसेच शेतीमध्ये आधुनिकीकरण आणेल”, असे पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले आणि सर्व हितसंबंधांना शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.