गोवा खबर : राज्यात कृत्रिम पद्धतीने फळे पिकवणाऱ्या विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार मोहीम सुरू केली असून, यामध्ये अनेक ठिकाणी धाडसत्र राबवण्यात आले आहे. म्हापसा आणि शिवोलीमधून आंब्यांची १८० क्रेट्स आणि सुमारे ४५० किलो केळी जप्त करण्यात आली. मडगावसह अन्य भागांतही कारवाईचे सत्र सुरुच आहे.
एफडीएच्या या कारवाईदरम्यान काही प्रसिद्ध हॉटेल्सची स्वच्छता तपासली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. स्वयंपाकघरात आढळलेली अस्वच्छता पाहून अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल मालकांना तात्काळ सुधारणा करण्याचा आदेश दिला आहे.
रासायनिक फळांवर कारवाई
म्हापसा व शिवोली येथील सब यार्डमध्ये एफडीए अधिकाऱ्यांनी तपासणी करून कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे ताब्यात घेतली. आंब्यांच्या १८० क्रेट्स आणि ४५० किलो केळी जप्त करून रासायनिक चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या फळांची बाजार किंमत सुमारे आठ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
गांधी मार्केटमध्ये छापा
मंगळवारी पहाटे ३ वाजता एफडीए अधिकाऱ्यांनी मडगावातील गांधी मार्केटमध्ये धाड टाकली. शिवोली, कुंडई, मडकई तसेच कर्नाटकातून आलेले आंबे येथे आढळून आले. यामध्ये कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे असल्याचा संशय असून, त्याचे २५ नमुने तपासणीसाठी घेतले गेले.
हॉटेल मालकाला २४ तासांचा अल्टीमेटम
म्हापसा येथील एका यार्डात तपासणी करताना एका हॉटेलमध्ये साफसफाईच्या बाबतीत गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हॉटेल मालकाला २४ तासात योग्य बदल करावेत, असा इशारा दिला आहे.
विक्रेत्यांकडून स्थानिक बाजारात फळांचा पुरवठा
एफडीएच्या माहितीनुसार, कृत्रिमरित्या पिकवलेली फळे स्थानिक फळविक्रेत्यांकडे विक्रीसाठी दिली जात होती. मडगाव, कालकोंडे, नावेली, गांधी मार्केट, मीनाक्षी हॉटेल परिसर आणि सोनसडा परिसरातील गोदामांमध्येही कारवाई करण्यात आली. केळी पिकवण्याच्या ठिकाणांचीही तपासणी झाली.
मंत्री राणेंचा पाठिंबा
अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री विश्वजीत राणे यांनी या कारवाईचे समर्थन करत नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा राबवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.