गोवा खबर : राज्यातील आरोग्य सेवांचे आधुनिकीकरण आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य खाते सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र काही डॉक्टर नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा डॉक्टरांनी वेळेत बदल स्वीकारावा, अन्यथा त्यांना घरी पाठवावे लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला.
म्हापसा येथे शनिवारी आयोजित आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ. आयडा नौरोन्हा, आरोग्य संचालिका डॉ. रुपा नाईक व डॉ. गिरीश परब उपस्थित होते.
‘स्टेट केअर’ संकल्पनेची घोषणा
पुढील तीन महिन्यांत ‘स्टेट केअर’ ही नवीन योजना राबवण्यात येणार असून, राज्यभर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे भरवली जातील. कार्डियोलॉजी व कार्डिओथोरेसिससारख्या गंभीर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठीही राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे राणे यांनी सांगितले.
१०० रुग्णवाहिका लवकरच सेवेत
१०८ रुग्णवाहिका सेवेअंतर्गत लवकरच १०० रुग्णवाहिका कार्यरत होतील. त्यात १० नव्या कार्डियाक रुग्णवाहिका समाविष्ट असतील. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात कार्डियोलॉजी सेवा सुरू करण्यात येईल, तसेच यूरोलॉजी आणि आयसीयूचेही आधुनिकीकरण केले जाईल.
जुन्या आझिलो रुग्णालयाचा पुनर्विकास
उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी न्यायालयीन जंक्शनजवळील आरोग्य केंद्र सुरु होईपर्यंत जुन्या आझिलो रुग्णालयातील सुविधा कार्यान्वित करण्याची विनंती केली. त्यावर प्रतिसाद देताना राणे यांनी जुन्या आझिलो रुग्णालयाचे संपूर्ण नुतनीकरण करून त्याला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची घोषणा केली.
आरोग्य खात्याच्या वापरासाठी म्हापशातील या जागेवर नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात येईल आणि ती जागा इतर खात्यांना दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी थेट त्यांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले.